भुसावळ येथे अध्यात्मिक प्रवचन मालेत आशुतोष अडोणी यांचे विचार
भुसावळ- महाराष्ट्रात भक्तीचा मळा फुलवण्याचे कार्य संत ज्ञानेश्वरांनीच केले असून त्यासोबतच संतांची मांदियाळी निर्माण करण्याचे श्रेयही त्यांनाच जाते, असे विचार आशुतोष वसंतराव अडोणी (नागपूर) यांनी येथे व्यक्त केले. शहरातील कोळी समाज मंगल कार्यालयात आयोजित तीन दिवसीय श्री ज्ञानेश्वरी माऊली सांस्कृतिक व बहुउद्देशीय मंडळाद्वारा आयोजित प्रवचन मालेत त्यांनी द्वितीय पुष्प गुंफले. अडोणी म्हणाले की, संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली भावार्थ दीपीका हे नऊ हजार ओव्यांचे एक महाकाव्य असून ते एक अलौकीक कार्य आहे. या ग्रंथातून कर्म, भक्ती व ज्ञान या प्रांतांचे सुस्पष्ट गुहा उलगडून दाखवण्यात आली आहे, अशी विभूती जन्मास येणे हे भारत देशाचे महाभाग्य आहे.
आज प्रवचन मालेचा समारोप
तीन दिवसीय प्रवचन मालेचा बुधवार, 5 रोजी समारोप होत आहे. प्रसंगी पहाटे साडेसहा वाजता ज्ञानेश्वरांच्या समाधी काळाचे अभंग, सामूहिक वाचन, सकाळी साडेसात वाजता सामुदायीक पारायण, अभंग ज्ञानेश्वरी, सकाळी नऊ वाजता ह.भ.प.जगदीश महाराज यांचे काल्याचे कीर्तन तर दुपारी तीन ते पाच बलभद्र भजनी मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम तर सायंकाळी सात वाजता प्रवचनमालेचे तिसरे पुष्प अडोणी गुंफतील. प्रवचनमालेस उपस्थिती द्यावी, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष एफ.आर.पाटील, सचिव प्रा.डॉ.रमेश जोशी, भास्कर भोळे, वासुदेव बोंडे, विवेक जोशी, वासुदेव भारंबे, दिलीप झोपे, सुरेश चौधरी आदींनी केले आहे.