संतोषी माता पतसंस्थेच्या ग्राहकाला दिलासा : व्याजासह पैसे देण्याचे जिल्हा ग्राहक मंचचे आदेश

भुसावळ : भुसावळातील संतोषी माता पतसंस्थेच्या ग्राहकाला जिल्हा ग्राहक मंचातून मोठा दिलासा मिळाला आहे. मुदत पूर्ण होऊनही ठेवीची रक्कम परत न मिळाल्याने ठेवीदार रमेश श्रावण तायडे यांनी संतोषी माता मर्चंट को.ऑप क्रेडिट सोसायटी विरूद्ध जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतली. ग्राहक मंचने दसादशे 9 टक्के व्याजासह तसेच शारीरिक त्रासापोटी 10 हजार रुपये व तक्रारीचा खर्च पाच हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे.

सहा महिन्यात ग्राहकाला दिलासा
संतोषी माता मर्चंट सोसायटीत ठेवीदार रमेश तायडे यांनी ठेव रक्कम जमा केली होती. मुदत पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम परत मिळावी, अशी मागणी करण्यात आली मात्र संस्थेने पैसे न दिल्याने त्यांनी 10 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हा ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली. त्यावर मंचने वरील आदेश दिले. ठेवीदाराची मुदत देय एकूण रक्कम एक लाख 11 हजार 10 रुपये अशी आहे. तक्रारीचा निकाल सहा महिन्यांत पूर्ण झाला. आयोग प्रभारी अध्यक्ष पूनम मलिक व सदस्य सुरेश जाधव यांनी आदेश दिला. ठेवीदारातर्फे अ‍ॅड.राजेश उपाध्याय यांनी काम पाहिले.