संत मुक्ताई पादुका पालखी सोहळ्याचे स्वागत

0

राजकीय पक्ष सामाजिक संघटनांतर्फे व्यापारी वर्ग यांच्यातर्फे स्वागतपर विविध उपक्रम ; पालखी मार्गावर काढल्या रांगोळ्या

मुक्ताईनगर- आषाढी एकादशीनिमित्त पंढरीला विठुरायाच्या दर्शनाला गेलेल्या संत मुक्ताई पादुका पालखी सोहळ्याचे मंगळवारी स्वगृही आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. सकाळी 10 वाजता संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे, तहसीलदार शाम गोसावी यांनी पालखी पूजन केल्यानंतर पालखी सोहळा जुन्या मुक्ताई मंदिराकडे मार्गस्थ झाला. पालखीच्या आगमनानिमित्त नवे मुक्ताई मंदिर ते जुने मुक्ताई मंदिर मार्गावर शहरवासीयांतर्फे भव्य स्वागत करण्यात आले.

पालखीचे ठिकठिकाणी स्वागत
पालखी सोहळ्यात आयोजित दिंडी स्पर्धेकरीता 82 भजनी मंडळांनी सहभाग नोंदविल्याने मुक्ताईनगरी टाळ, मृदुंगाच्या मंगलमय सुरात ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम व संतांच्या विविध अभंगांच्या नामघोषात पालखी सोहळा अतिशय थाटात निघाला. पालखी मार्गावर अनेक ठिकाणी विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनांतर्फे व्यापारी वर्ग यांच्यातर्फे स्वागतपर विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. पालखी मार्गावर श्री स्वामी समर्थ केंद्र जुनेगावतर्फे सेवेकरी महिला व मुलींनी आकर्षक रांगोळ्या काढून सेवा दिली.

वारकर्‍यांना चहा, पाणी, फळांचे वाटप
पालखी सोहळा नवीन मंदिरावरून निघाल्यानंतर नगरपंचायत मुक्ताईनगरतर्फे हायवे चौफुलीवर माजी मंत्री एकनाथराव खडसे, नगराध्यक्षा नजमा तडवी यांच्या उपस्थितीत केळी वाटप करण्यात आले. साई फ्रेंड्स ग्रुपतर्फे चहा, पाणी वाटप, श्रीराम फाउंडेशनतर्फे सचिन पाटील यांच्या हस्ते दहा हजार मुक्ताई चालिसा, हरीपाठ पुस्तके वाटप, श्री स्वामी समर्थ केंद्र जुनेगावतर्फे बिस्किट वाटप, जय मल्हार सेनेतर्फे राजगिरा लाडू वाटप तसेच साई चौकात शिवसेनेतर्फे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील व पदाधिकारी आणि महिला आघाडी पदाधिकारी व असंख्य महिला यांच्याहस्ते वारकरी दिंडीत सहभागी झालेल्या भजनी मंडळातील विणेकरी महिलांना व पालखी सोहळ्यात पंढरपूरला गेलेल्या महिलांना नवीन साडी भेट स्वरूपात देण्यात आली. वारकरी पुरुषांना रुमाल, टोपी, नारळ व पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले तसेच भुसावळ मार्गावर संजय कपले यांच्याकडून नारळ भेट व माळी परीवारातर्फे मातृ-पितृ पूजन करीत लाडू प्रसाद वाटप करण्यात आले. विविध ठिकाणी सामाजिक संस्था काही व्यापारी दुकानदार यांच्यातर्फे ठिकठिकाणी चहा, पाणी, फळे वाटप करण्यात आली

यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
पालखी सोहळा यशस्वीतेसाठी हभप रवींद्र हरणे महाराज, हभप नितीन महाराज, हभप ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, हभप अजय सोनार महाराज, हभप भावराव महाराज, हभप विशाल महाराज खोले, संदीपभैय्या पाटील, विनायकराव हरणे, पुरुषोत्तम वंजारी, ज्ञानेश्वर हरणे, सुधाकर सापधरे आदींनी परीश्रम घेतले. जुन्या मंदिरावर पालखी सोहळा पोहोचल्यानंतर पालखी सोहळ्या ची सांगता हभप रवींद्र हरणे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.

दिंडी स्पर्धेत 80 भजनी मंडळांचा सहभाग
पालखी मार्गावर वारकरी संप्रदाय दिंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात एकूण 82 भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी आठ बालगट, 42 महिला गट, 32 पुरुष गट सहभागी होते. भजनी मंडळांनी वारकरी संप्रदायाच्या विविध कलाकृतींचे दर्शन पालखी मार्गावर घडवले. हरीनामाच्या नामघोषात व टाळ, मृदुंगाच्या गजरात तसेच संगीतमय वातावरणात व्यसनमुक्ती आणि स्त्री भ्रूणहत्या व संस्कृती टिकविण्याचे आव्हान करणारे पथनाट्य सादर करण्यात आले. उत्कृष्ट कलाकृती सादर करणार्‍या भजनी मंडळांपैकी बाल गटातून प्रथम चैतन्य कानीफनाथ बाल भजनी मंडळ, खिरवड, ता.रावेर , द्वितीय जय बजरंग बाल भजनी मंडळ, विरोदा, ता.बर्‍हाणपूर, तृतीय गौरी शंकर बालिका भजनी मंडळ, पिंपळगाव, ता.जळगांव जामोद, महिला गटातून प्रथम माणकेश्वर महिला भजनी मंडळ, नरवेल, ता.मलकापूर, द्वितीय आदिशक्ती मुक्ताई महिला भजनी मंडळ, उमरा, ता.संग्रामपूर, तृतीय महर्षी वाल्मिक महिला मंडळ, टूमकी, ता.संग्रामपूर तसेच पुरुष गटातून प्रथम तानाई वारकरी शिक्षण संस्था, गुलाबबाबा मंडळ काटेलधाम, ता.तेल्हारा, द्वितीय जय हनुमान भजनी मंडळ, दोधे ता.रावेर, तृतीय श्री लक्ष्मीनारायण भजनी मंडळ, लोणी ता.बर्‍हाणपूर या मंडळांना पारीतोषिक रक्कम व मानपत्र तसेच स्मृतीचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून नरेंद्र नारखेडे , सुनील काळे, भावराव महाराज , सुधाकर सापधरे यांनी काम पाहिले.

लोकसहभागातून महाप्रसाद
शहरातून घराघरातून दोन लाख पोळ्या जमा करण्यात येवून एकत्रीत काला करून महाप्रसादाचा वारकरी व भाविकांना देण्यात आला. दरम्यान,
पंढरपूरहुन पालखीसोबत आलेले श्‍वान जुन्या मुक्ताई मंदिरात आल्यानंतर स्थिरावले. या श्‍वानाने पाहण्यासाठीदेखील भाविकांची गर्दी झाली.