संत मुक्ताबाई आषाढी वारी पालखीचे 1 रोजी होणार आगमन
वारकरी सांप्रदायिक दिंडी स्पर्धेचे तीन गटात आयोजन
मुक्ताईनगर : आदिशक्ती मुक्ताबाई आषाढी परतवारी पालखी सोहळ्याचे आगमन सोमवार, 1 ऑगस्ट रोजी होत आहे. या निमित्ताने मुक्ताई संस्थान व पालखी आगमन सोहळा उत्सव समिती, ग्रामस्थ मंडळी मुक्ताईनगर कोथळी सालबर्डी व मुक्ताई वारकरी बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वारकरी सांप्रदायिक दिंडी स्पर्धा बाल, महिला व पुरूष गटात स्वतंत्र बक्षिसाने आयोजित करण्यात आली आहे.
उत्साहाने पालखी स्वागताची परंपरा
श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी- मुक्ताईनगर येथून श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठूरायाचे दर्शनासाठी पालखी सोहळा अखंडितपणे अनेक वर्षांपासून जात असतो. कोथळी मुक्ताईनगरात पालखी परत येताना शहर व परीसरातील नागरीक पालखी आगमन सोहळा भव्य-दिव्य उत्सवाने साजरा करतात.
वारकरी संप्रदायातर्फे दिंडी स्पर्धेचे आयोजन
यावर्षी सोमवार, 1 ऑगस्ट रोजी पालखी आगमन करीत असल्याने वारकरी संप्रदाय दिंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बालगटासह महिला व पुरूष गटात प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षीस प्रायोजकांच्या माध्यमातून दिले जाणार आहे. गायन, वादन, ताल, सूर, पावली, वेशभूषा दिंडी सादरीकरणाचे नवीन मंदिर ते जुने मंदिरादरम्यान परीक्षण करण्यात येईल. दिंडी स्पर्धेकरीता शनिवार, 30 जुलै पर्यंत भजनी मंडळानी हभप विनायकराव भरणे व हभप उद्धव महाराज जुनारे यांच्याकडे प्रवेश नोंदणी फॉर्म भरावेत, असे संस्थान अध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील, पालखी सोहळा प्रमुख हभप रवींद्र महाराज हरणे यांनी केले आहे.