संत सावता महाराज अभिवादन मिरवणूक

0

पुणेः श्री संत शिरोमणी सावता महाराज यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यकार्यातून श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. याच श्रम प्रतिष्ठेचा सन्मान करण्यासाठी माळी समाज प्रबोधिनीच्यावतीने श्रम प्रतिष्ठेचा संदेश देणारा मिरवणूक सोहळा शुक्रवारी संपन्न झाला.

यावेळी माळी समाज प्रबोधिनीचे कार्याध्यक्ष दीपक कुदळे, जगन्नाथ लडकत, दीपक जगताप, दशरथ कुळधरण, आमदार योगेश टिळेकर, महेश लडकत, मृदुंगाचार्य तुकारामबुवा भूमकर तसेच समाजातील राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. सारसबागे समोरील सावित्रीबाई फुले पुतळ्यापासून या मिरवणुकीस प्रारंभ झाला. बाजीराव रस्त्याने शनिवारवाड्यावर या मिरवणुकीचे सभेत रूपांतर झाले. या सभेत मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या मिरवणुकीत पुणे आणि उपनगरात असलेल्या संत शिरोमणी सावता महाराज यांच्या सुमारे 25 मंदिरांच्या अध्यक्षांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. मृदंगाचार्य हभप तुकारामबुवा भूमकरगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली 101 पखवाजवादक आणि 101 टाळवादकांची दिंडी श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या गजरात मिरवणुकीत सहभागी झाले होते. या सोहळ्यातील सुशोभित केलेला रथ, वारकरी संप्रदायाची दिंडी आणि मोठा जनसमुदाय हे मुख्य आकर्षण होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील संत सावता महाराज मंदिरांच्या 25 मंडळांचा या मिरवणुकीत सहभाग होता. तसेच येथील सर्व सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.