पुणे । करिअरमध्ये कलाटणी देणार्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी घेतलेल्या प्रयत्नांचे यश संपादन करण्याने सार्थक झाले. आता जेथे संधी मिळेल तेथे प्रामाणिकपणा आणि ध्येयनिष्ठेने काम करून संधीचे सोने करू. दुसर्याच प्रयत्नामध्ये स्पर्धा परीक्षेत यश मिळाल्याचा विलक्षण आनंद आहे. अभ्यास कशा पद्धतीने करायचा याची दिशा मिळाली. भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा असून जिथे संधी मिळेल तिथे उत्तम प्रशासन देण्याचाच माझा प्रयत्न राहील, अशी प्रतिक्रिया स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी ठरलेल्या पीयूष साळूंकेने दिली.
तर 131 वी आलेली वल्लरी गायकवाड म्हणाली, आयएलएस विधी महाविद्यालयातून विधी शाखेची पदवी आणि नंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एलएलएम पूर्ण केले. भारतीय परराष्ट्र सेवेमध्ये जाण्याची इच्छा असून त्यालाच प्राधान्य दिले आहे. परराष्ट्र धोरण आणि मुत्सद्देगिरीला असलेले महत्त्व ध्यानात घेऊन या धोरणाद्वारे देशात सुयोग्य बदल घडवून आणता येऊ शकतात याची खात्री असल्यामुळे भारतीय परराष्ट्र सेवेमध्ये जाणार आहे. स्वयंअध्ययनावर आणि उत्तर लेखनाच्या पद्धतीवर विशेष भर दिल्याने हे यश संपादन करता आले.
कष्टाचे सार्थक झाले
304 वा आलेला जगदीश जगताप म्हणाला, मी मूळचा कराड (जि. सातारा) येथील कोडोली गावचा. दंतवैद्यक विषयात मी पदवी संपादन केली आहे. माझे आई-वडील शेतकरी आहेत. तिसर्या प्रयत्नामध्ये मला हे यश मिळाले आहे. कष्टाचे सार्थक झाल्यामुळे मी आनंदी आहे. युनिक अॅकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव आणि मल्हार पाटील म्हणाले, एकूण गुणवत्ता यादीमध्ये 68 विद्यार्थी चमकले आहेत. युनिक अॅकॅडमीतून मार्गदर्शन घेतलेले गिरीश बडोले हे देशात विसाव्या स्थानी असून राज्यात पहिले आले आहेत.
पेठा घडवतात देशातील अधिकारी
स्पर्धा परिक्षांचा निकाल लागला की टॉपर विद्यार्थ्यांमध्ये पुण्यात अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांच्या क्रमांक असतोच असतो. पुण्यात स्पर्धा परिक्षांसाठीचे मार्गदर्शन करणारे शेकडो क्लासेस आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठीच्या अभ्यासिका या जवळपास 150 च्या आसपास आहेत. खास करुन पुण्यातला मध्यवर्ती भाग असलेल्या सदाशिव व नारायण पेठेत सर्वाधिक अभ्यासिका व स्पर्धा परिक्षांची मार्गदर्शन करणारे क्लासेस आहेत. सध्या पुण्यामध्ये स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे अडीच लाख विद्यार्थी असून या दोन पेठांमधली संख्या जवळपास लाखाच्या आसपास आहे. साहजिकच राज्याच्या कानाकोपर्यातून स्पर्धा परिक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना या पेठा आता खुनावत आहेत.