घर खाली करण्यासाठी दीरांनी पाठविले गुंड
देहूरोड । देहूरोड बाजारपेठेतील एका व्यापारी कुटुंबात संपत्तीचा वाद सुरू आहे. या वादातूनच विधवा भावजयींचे घर खाली करण्यासाठी त्यांच्या दीरांनीच भाडोत्री गुंड पाठविले होते. या गुंडांनी त्या महिलांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु, शेजारच्या लोकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. नंतर जमलेल्या नागरिकांनी त्या गुंडांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार गुरुवारी रात्री देहूरोड परिसरात घडला. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी देहूरोड परिसरातील बहुसंख्य व्यापार्यांनी बंद पुकारला होता. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध दंगल माजविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.
निषेधासाठी मोर्चा
गुरुवारी दोन भाडोत्री गुंड त्यांच्या सहकार्यांसोबत या दोन्ही महिलांच्या घरी आले होते. त्यांनी घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, याचवेळी आजूबाजूच्या लोकांनी त्यांना हटकले. मात्र, या गुंडांनी लोकांनाच दमदाटी करण्यास सुरुवात केली. शेवटी याठिकाणी गर्दी वाढली. नंतर चिडलेल्या जमावाने गुंडांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, या घटनेचा देहूरोड परिसरातील व्यापार्यांनी निषेध नोंदविला आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास सर्वपक्षीय नेतेमंडळी, कार्यकर्ते, व्यापारी यांनी बाजारपेठेतून मूक मोर्चादेखील काढला. दोषींवर कारवाईची मागणी केली होती.
संपत्ती हडपण्याचा प्रयत्न
देहूरोड बाजारपेठेतील दोन विधवा महिलांचे घर खाली करण्यासाठी त्यांच्याच नातेवाईकांनी भाडोत्री गुंडांना पाठविले होते. यावेळी मध्यस्थी करणार्या स्थानिक नागरिकांच्या अंगावर या गुंडांनी चाल केली. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने गुंडांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दोन्ही महिला नात्याने जावा असून, दोघींच्या पतींचे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांची संपत्ती आपणास मिळावी, या उद्देशाने त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांना सातत्याने त्रास दिला जात आहे. या प्रकारातून अनेकवेळा त्यांच्यात भांडणेदेखील झाली आहेत. या संदर्भात देहूरोड पोलीस ठाण्यात नोंदही झाली आहे. संपत्ती हडप करण्याच्या उद्देशाने हा प्रकार सुरू असल्याचा आरोप त्या महिलांनी केला आहे.