संपाचे राज्यभर तीव्र पडसाद हिंसक वळण

0

मुंबई ।  राज्यातील शेतकरी आजपासून संपावर गेला आहे. राज्यभर त्याचे तीव्र पडसाद उमटले असून संपाला हिंसक वळण लागले. काही ठिकाणी गाड्या फोडल्या तर काही ठिकाणी शेतकर्‍यांना व्यापार्‍यांनी आमि पोलिसांनी मारहाण केली आहे. शेतकर्‍यांच्या संपामुळे दूध, भाजीपाला, फळे यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा तुडवडा निर्माण झाला आहे. शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसेच शेतकर्‍यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला आहे. पीक काढायचे नाही, दूध शहरापर्यंत पोहोचवायचं नाही आणि कोणत्याही शेतमालाची विक्री करायची नाही, असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे.

व्यापार्‍यांची शेतकर्‍याला मारहाण
औरंगाबादमध्ये शेतकर्‍यांच्या संपाला आज सकाळीच हिंसक वळण लागले. औरंगाबादमधील जाधववाडी मार्केटमध्ये शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांना काही व्यापार्‍यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतो आहे. जाधववाडी मार्केटमध्ये जयाजीराव सूर्यवंशी त्यांच्या सहकार्‍यांसह बाजार बंद करण्याचे आवाहन करत होते. याचवेळी काही व्यापार्‍यांनी त्यांना मारहाण केल्याची तक्रार शेतकर्‍यांनी केली. जयाजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्त्वाखाली शंभराहून अधिक शेतकरी बाजार बंद करण्याचे आवाहन करीत होते, त्याच दरम्यान व्यापार्‍यांनी एकत्र येऊन जयाजीराव सूर्यवंशीसह 5 शेतकर्‍यांना मारहाण केली. व्यापार्‍यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी विरोध केला तरी आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका शेतकर्‍यांनी घेतली आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकर्‍यांनी टोमॅटो, कांदे फेकत बाजार बंद करण्याचा प्रयत्नही केला.

मुंबईला जाणारे 10 लाख लिटर दूध रोखण्यात आले
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी न फिरकल्याने व्यवहार ठप्प आहेत. नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत 500 गाडयांची आवक झाली आहे.नगर-कल्याण हायवेवर टाकळी ढोकेश्वर,ता.पारनेर जि.अहमदनगर येथे शेतकर्‍यांनी चेकपोस्ट उभारले आहेत. प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करून शेतमालाची वाहने रोखून धरली जात आहेत. नगर जिल्ह्यातील 3500 दूध संकलन केंद्रे, 500 शीतकरण केंद्रे व प्रकल्प संपादरम्यान बंद राहणार आहेत. संपकाळात मुंबईला जाणारे 10 लाख लिटर दूध रोखण्यात आले आहे. तसेच सर्व बाजार समित्या बंद राहणार. संप यशस्वी करण्यासाठी राज्यात गनिमी कावा पथके कार्यरत झाली आहेत. दरम्यान माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संपाला पाठिंबा जाहीर केला आहे. तर खासदार उदयनराजे भोसले यांनी वाहतूकदारांना इशारा दिला आहे. मुंबईला जाणारे गोकुळचे 12 लाख दूध अडवणार असल्याचे ते म्हणाले.

पहिली ठिणगी सातार्‍यात
शेतकरी संपाची पहिली ठिणगी सातारा जिल्ह्यात पडली. पुणे-बंगळुरु महामार्गावर शेतकर्‍यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. सातार्‍यात शेतकरी संघटनेने कोल्हापूरहून मुंबईला जाणारी दूध वाहतूक रोखून ट्रकची तोडफोड केली. वारणा दूध डेअरीचे हे दोन ट्रक होते. यावेळी कार्यकर्त्यांनी ट्रकचालकाला मारहाण केली.

ट्रक अडवणार्‍या शेतकर्‍यांना पोलिसांची मारहाण
नाशिक-औरंगाबाद महामार्गावर दूध आणि भाजीपाल्याचे गाडी अडवणार्‍या आठ शेतकर्‍यांना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलक शेतकरी रस्त्यावर दूध, भाजीपाला फेकत होते. त्यानंतर रात्री तीनच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली आहे. तर राज्य राखीव दलाच्या तुकड्यांनी शेतकर्‍यांना बेदम मारहाण करत त्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमिती ठप्प
शेतकरी संपामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती ठप्प झाली आहे. किरकोळ अपवाद वगळता शेतकर्‍यांनी समितीकडे पाठ फिरवली. एरव्ही गजबजलेल्या समितीत आज शुकशुकाट पाहायला मिळाला.

काही व्यापार्‍यांकडून लूट
शेतकर्‍यांनी संप पुकारल्यामुळे शहरातली जनता गॅसवर आहे. शेतकरी संपावर गेल्याने भाजीपाला, दूध कसे मिळणार या प्रश्नामुळे अशा अनेक प्रश्नांमुळे शहरातल्या जनतेची तारांबळ उडाली आहे. तर दुसरीकडे शेतकर्‍यांनी घोषित केलेल्या संपाचा काही संधीसाधू व्यापार्‍यांनी गैरफायदा घ्यायला सुरुवात केली आहे. अचानक भाज्यांचे भाव वाढवून व्यापार्‍यांनी सामान्यांची लूट सुरु केली आहे.

केळी घेवून जाणारा ट्रक फोडला
अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये आंदोलन पेटले, केळी घेवून जाणारा ट्रक फोडण्यात आला. यावेळी फळ व्यापा-यांकडून आंदोलकांना धक्काबुक्की करण्यात आली. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील निघोजमध्ये सकाळी बसस्टॉपवर दुध व भाजीपाला फेकून निषेध केला. शिर्डीत रस्त्यावर दूध ओतून शेतकर्‍यांनी निषेध केला. शेतकर्‍यांच्या विविध संघटना या संपात सहभागी झाल्याने शेतकर्‍यांकडून या संपाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

कोल्हापूर : कोट्यावधी नागरिकांची दुधाची गरज पूर्ण करणार्‍या जगातील दुध उत्पादकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून एक जून हा जागतिक दुग्ध दिवस म्हणून साजरा केला जातो. पण राज्यभरातील शेतकर्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे मात्र ऐन उत्सवादिवशीच दुध पट्ट्यात अस्वस्थता पसरली.

जागतिक दुग्ध दिनादिवशीच दुध रस्त्यावर
शेतकर्‍यांनी संप केल्याने त्याचा परिणाम दुध संकलनावरही झाला. पश्चिम महाराष्ट्रात काही दुध संस्थानी संकलन पूर्ण बंद ठेवले तर काही दुध संस्थांनी शेतकर्‍यांना आदल्या दिवशी रात्रीच तातडीच्या सुचना देवून धारा लवकर काढण्याचे आवाहन केले. ज्या ज्या गावांत सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान दुध संकलन करुन दुधाच्या गाड्या बाहेर पडत होत्या. त्या गावांमध्ये सकाळी आठच्या आतच दुध गावातून बाहेर पाठविण्यासाठी दुध संस्थांची लगबग सुरु होती.