औरंगाबाद : मराठवाडा दुष्काळानं होरपळत असून संपूर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची गरज आहे. मात्र, राज्य सरकार शास्त्रीय चाचपण्या करत आहे. लोक मरत असताना शास्त्रीय पद्धतीनं दुष्काळ जाहीर करण्याची वाट कसली पाहता?; अभ्यास कसले करता, असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज फडणवीस सरकारला केला.
काँग्रेस पक्षानं दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आज चर्चा व चिंताबैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला मार्गदर्शन करताना चव्हाण यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ‘राज्य सरकार शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. मराठवाड्यात आठपैकी पाच जिल्ह्यांतील पैसेवारी ५० टक्क्यांहून अधिक दाखवली आहे. त्यामुळं या जिल्ह्यांना दुष्काळी लाभ मिळणार नाही, अशी भीती चव्हाण यांनी व्यक्त केली. तर, हवामान खात्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.