जळगाव । संभाजीनगरातील माऊली मेडीकलला आग लागून संगणक, लाकडी टेबल तसेच औषधीसह अंदाजे 5 लाखांचा ऐवज जळून खाक झाला आहे. शुक्रवारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ मूळ यावल तालुक्यातील हंबर्डी येथील रहिवासी सागर राजेंद्र बाविस्कर हा आशाबाबानगरातील आपले मामा विजय काशीनाथ वागळे यांच्याकडे वास्तव्यास आहेत़ त्यांचे संभाजीनगर स्टॉपनजीक भाड्याच्या दुकानात माऊली नावाचे मेडिकल अॅण्ड जनरल स्टोअर्स आहे़ रोज सकाळी नऊ वाजता मेडिकल उघडले जाते.
दुपारी 1 वाजता बंद करून परत सायंकाळी 4 दुकान उघडले जाते. रात्री 10 वाजेपर्यंत मेडिकल सुरू असते़ सागरने शुक्रवारी दुपारी 1 वाजता नेहमीप्रमाणे मेडिकल बंद केले़ यानंतर दुकानमालकाच्या मुलाचा एका खाजगी हॉटेलमध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम असल्याने सागर त्याठिकाणी गेला़ तेथे असताना संभाजीनगरातील रहिवाश्यांचा मेडिकलला आग लागल्याचा फोन त्याला आला़ माहिती मिळताच सर्वांनी घटनास्थळाकडे धाव घेतली़
दोन अग्निशमन बंबांनी विझविली आग
शॉर्टसर्किट होऊन मेडिकलमधील मीटर जळाले़ तापमानामुळे काही वेळातच आग पसरली़ या आगीत तासाभरात मेडिकलमधील औषधी, संगणक, लाकडी टेबल, सौंदर्य प्रसाधने, खुर्ची याचा अक्षरश: कोळसा झाला होता़ येथील रहिवाशांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला फोनवरून माहिती दिली़ त्यावरून तत्काळ घटनास्थळी महापालिकेचे दोन अग्निशमन बंब दाखल झाले़ त्यांनी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळविले़ तोपर्यंत पाच लाखांचे साहित्य जळून खाक झाले होते़ अग्निशमन बंब वेळेवर पोहचल्याने दुकानातील एकूण औषधीपैकी एक लाखाच्या औषधी सुरक्षित राहिल्या़ येथील रहिवाशांनी तसेच तरुणांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले़ दुकानातील जळालेल्या वस्तू बाहेर काढल्या़