संभाजी भिडे यांच्या सभेला परवानगी देऊ नये

0

जळगाव । संभाजी भिडे यांची 27 मे रोजी जळगावात सभा आयोजित करण्यात आली असून कायदा व सुवस्थेचा प्रश्‍न असल्याने व शांततेचा भंग होण्याची शक्यता असल्याने या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी राष्ट्रीय दलित पॅथरतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न !
1 जानेवारीला भिमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे व मिलींद एकबोटे यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून जळगाव हे शांतता व एकोप्याचे शहर आहे. संभाजी भिडेमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्भवू शकतो. जिल्हयात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला शासन जबाबदार असेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सोनवणे, जिल्हा अध्यक्ष सुदाम सोनवणे, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राजु महाले, जिल्हा सरचिटणीस प्रेमचंद सुरवाडे, शहर अध्यक्ष राजू तायडे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. दरम्यान, कार्यक्रम रद्द न झाल्यास दलित पॅथर आपल्या स्टाईलने आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.