पुणे। गेल्या सत्तर वर्षांपासून शेजारी आपल्यासाठी डोकेदुखी ठरत असून त्यांना बदलणे शक्य नसले तरी आपण इतिहास बदलू शकतो, अशा शब्दांत संरक्षण आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. रविवारी पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी संस्थेच्या नवव्या पदवी प्रदान समारंभ सोहळ्यात ते बोलत होते.
अद्ययावत शस्त्र सामग्रीची गरज
संरक्षण क्षेत्रातील स्वयंसिद्धता प्राप्त करण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील भागिदारी महत्त्वाची असल्याचे सांगत जेटली म्हणाले की, देशाला संरक्षणक्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी संशोधन आणि उत्पादकता या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. यामध्ये (डीआयएटी) संस्थेची भूमिका महत्वपूर्ण असेल. गेल्या 70 वर्षांपासून शेजारी आपल्यासाठी डोके दुखी ठरत असून, त्यांना बदलू शकत नाही, पण इतिहास बदलू शकतो, अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. इतर देशावर अवलंबून न राहता देशात संरक्षण साहित्याची निर्मिती करण्याची गरज आहे. भारत जगातील एकमेव देश आहे, जो एकाचवेळी घुसखोरी आणि दहशतवाद या विरोधात लढत आहे. त्यासाठी अद्ययावत शस्त्र सामग्री महत्वाची आहे. यावेळी अर्थव्यवस्थेचा विकास हा शेतीशी जोडलेला असल्याचे सांगत शेतकर्यांना तंत्रज्ञानाशी जोडणे मोठं आव्हान असल्याचे ते म्हणाले.