भुसावळ। ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचे आदेशानुसार कर्मचार्यांंना सुटीच्या बदल्यात मिळणारा ओव्हरटाईम पुर्णपणे कायमचा बंद करुन कर्मचार्यांच्या वेतनावर आघात करण्यात आला आहे. त्या विरोधात आयुध निर्माणी कामगार युनियनच्या वतीने बुधवार 29 रोजी आयुध निर्माणी प्रवेशद्वारावर बोर्ड आणि सरकारविरोधात काळी फित लावून विरेाध दिवस पाळण्यात आला.
संरक्षण मंत्रालयास पत्र लिहून विरोध
आयुध निर्माणी बोर्डाच्या आदेशानुसार सुटीच्या बदल्यात करण्यात येणारा ओव्हर टाईम 1 एप्रिल पासून बंद करण्याचा निर्णय झाला असून याबाबत पहिल्या 3 महिन्यांसाठी प्रायोगित तत्वावर लागू करुन त्याला अंतिम स्वरुप देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे कर्मचार्यांचे नुकसान होणार असल्यामुळे संरक्षण कामगारांमध्ये नाराजी आहे. त्यासाठी सकाळी 7.15 वाजेपासून निर्माणी मुख्य द्वारासमोर कामगार उपस्थित राहून काळ्या फित लावून विरोध दर्शविण्यात आला. ऑल इंडिया फेडरेशन व डिफेन्स एम्प्लॉइज फेडरेशनने तत्काळ आयुध निर्माणी बोर्ड व संरक्षण मंत्रालयास पत्र लिहून विरोध दर्शविला. पत्रात असेही नमूद करण्यात आले की, या आदेशाने कर्मचार्यांच्या पे पॉकिटवर परिणाम होणार असून सुटीच्या बदल्यात ओव्हर टाईम नसल्याने कर्मचारी सुटी घेतील व याचा परिणाम उत्पादनावर होईल म्हणून हा आदेश रद्द करण्यात यावा त्यासाठी आयुध निर्माणी बोर्ड व संरक्षण मंत्रालयाचे लक्ष वेधण्यासाठी आजच्या दिवशी काळी फित लावून विरोध दिवस पाळण्यात आला.
प्रवेशद्वारावर घेतली सभा
याप्रसंगी आयुध निर्माणी कामगार युनियनचे युनियनचे सचिव दिनेश राजगिरे, सभासद दिपक भिडे यांनी आयुध निर्माणीच्या प्रवेशद्वारासमोर सभा घेऊन आंदोलनात सहभागी झालेल्या कामगारांना संबोधित केले. व शासनाच्या या निर्णयाविरोधात मत व्यक्त केले. तसेच या निर्णयामुळे कामगारांचे कशाप्रकारे नुकसान होणार आहे. याची देखील कामगारांना माहिती दिली. व शासनाच्या कर्मचार्यांच्या हिताला प्राधान्य देऊन हा कामगार विरोधी निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी प्रविण पाटील, किशोर पाटील, प्रविण मोरे, गोपाळ सुरळकर, प्रविश बार्हे, इस्माईल तडवी, किशोर बढे, राकेश ठाकूर, नाना जैन यांनी परिश्रम घेतले. फेडरेशनचे उपाध्यक्ष कॉ. राजेंद्र झा यांचे मार्गदर्शन लाभले.