जळगाव : आजच्या स्पर्धेच्या काळात जेवढा ताण पाल्यांना असतो, त्यापेक्षाही पालकांना अधिक तणाव येतो. यातच मुलांचे संगोपन करताना प्रत्येक मुलगा महत्त्वाचा समजून त्यांना आपलेसे करावे. संवादातून मुलांशी मित्रत्व करावे, आपली बंधने मुलांवर लाटू नका, असे आवाहन करत डॉ.हरिष शेट्टी यांनी 21 व्या शतकातील पालकत्व या विषयावर पालकांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. सायकियॉट्रिक सोसायटीतर्फे रविवारी कांताई सभागृहात मुंबईचे प्रसिद्ध मानसोपचार जज्ज्ञ डॉ.हरिष यांच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सायकियॉट्रिक सोसायटीचे डॉ.सतीष पाटील, डॉ.किर्ती देशमुख, डॉ.प्रदीप जोशी, डॉ. उल्हास बेंडाळे, डॉ.मयूर मुठे, डॉ.दिलीप महाजन, डॉ.विजय श्रीमुठे, डॉ.अनिता नागरगोजे आदी उपस्थित होते.
मुलांना आर्थिक संस्कार द्या
डॉ.शेट्टी यांनी उपस्थित पालकांना हसत-खेळत पालकत्वाच्या टिप्स दिल्या. एकाग्रता कमी झाल्यास मार्गदर्शन घ्यावे. मुलांसोबत लहानपणापासूनच मोकळे रहायला हवे. अचानक त्यांच्यासोबत फ्रेंडली होता येत नाही. आपल्या काही गोष्टी कथास्वरुपात सांगा. आपले मन मोकळे करा. मी पणा त्यांना सांगू नका. कुणाशीही त्यांची तुलना करु नका.तसेच प्रत्येकाची एकाग्रता वेगवेगळी आहे. जर अचानक मुलांची एकाग्रता कमी झाली तर गोंधळ आहे, हे समजून त्यांना तज्ज्ञांकडे न्यावे. लहानपणापासूनच मुलांना कुटुंबातील आर्थिक गणिते कळायला हवी.त्याला सांगा की, तुम्ही किती कमावता. आर्थिक संस्कारांमुळे त्याला पैशाची किंमत कळेल. तसेच पैसे कसे कमावता, याचे शिक्षणही मिळेन अन् हे त्याच्या भावी आयुष्याकरीता कामात येईल. घरातील प्रत्येक मुललगा हा महत्वाचा असतो. लहानपणापासून मुलाचे कर्तृत्व ओळखून त्याला प्रोत्साहन द्या, प्रत्येक मुलगा हा विशेष असतो आणि तो त्याच्या आवडीप्रमाणे शिकतो. तसेच कोणताही मुलगा लहानपणापासून गुन्हेगार नसतो, असेही त्यांनी पालकांना सांगितले.