संविधानाचे रक्षण करणार्‍यांसोबत रीपाइं : केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले

Those who do not accept the Constitution should leave the country: Union Social Justice Minister Ramdas Athawale

भुसावळ : या देशात राहणार्‍यांना संविधान मान्य करावेच लागेल व ज्यांना संविधान मान्य नसेल त्यांनी देश सोडावा, असे स्पष्ट मत रीपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे व्यक्त केले. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सोमवारी सायंकाळी रीपाइंच्या 66 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित भव्य मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी आठवले म्हणाले की, संविधानाचे संरक्षण करणार्‍यांसोबत मी असून देशातील कोणत्याही पंतप्रधानाने संविधानाला माथा टेकला नाही मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यास अपवाद आहेत.

भारताला तोडणार्‍यांविरोधात चळवळ उभारली
केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले की, मी नुकताच मॉरीशस दौरा केला व महामानवाच्या पुतळ्याचे उद्घाटन माझ्याहस्ते करण्यात आले. महामानवाचे विचार हे समस्त मानवजातीला एकत्र करणारे आहेत. बाबासाहेबांना जातीव्यवस्था संपवायची होती, त्यांचा ब्राह्मणांना कधीही विरोध नव्हता मात्र ब्राह्मण्यवादाचा त्यांनी नेहमीच विरोध केल्याचे ते म्हणाले. भारताला तोडणार्‍यांविरोधात मी चळवळ उभारल्याचे ते म्हणाले.

प्रचार करणारे करीत राहतील
आठवले म्हणाले की, भाजपाविषयी काही लोक प्रचार करीत आहेत मात्र टिका करणार्‍यांना करू द्या मी त्यांच्यासोबत आहे. संविधानाचे संरक्षण करणार्‍यांसोबत मी आहे. संविधानापुढे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी माथा टेकवला असल्याचे आठवले म्हणाले. मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी 17 वर्ष संघर्ष चालला व त्यानंतर आमच्या प्रयत्नांनी विद्यापीठाला महामानवाचे नाव मिळाल्याचे त्यांनी सांगत एकदा आम्ही आंदोलन करायला लागलो की मागे हटत नाही.

शिंदे-ठाकरेंमधील सामना होणार रंजक
आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरेंना दसर्‍या मेळाव्यासाठी शिवतीर्थ मैदान मिळाले असून त्यांना भाषणासाठी शुभेच्छा देतो कारण तेदेखील माझे चांगले मित्र आहेत मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता सर्व आमदार असल्याने तेदेखील मुख्यमंत्री झाल्यापासून मिश्कीलपणे बोलतात त्यामुळे दोघांमधील भाषणाचा सामना रंजक होणार असल्याचे आठवले म्हणाले. भुसावळातील रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

आठवले जिथे, सत्ता तेथे : गिरीश महाजन
मंत्री गिरीश महाजन यांनी आठवले जिथे जातात सत्ता तेथे येत असल्याचे सांगून तुम्ही आता नेहमीसाठीच आमच्यासोबत रहा, असे सांगितले. देशाची वाटचाल महाशक्तीच्या दिशेने सुरू असल्याचे ते म्हणाले. महामानवाने देशाला घटना दिल्याने मी देखील या पदापर्यंत पोहोचू शकल्याचे त्यांनी सांगितले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री अविनाश महातेकर, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, रीपाई उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, जळगाव जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, गौतम सोनवणे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यशा चंद्रकांता सोनकावळे, अ‍ॅड.अयुब शेख, कोकण प्रदेशाध्यक्ष जगदीश गायकवाड, नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, राष्ट्रीय नेत्या आशा लांडगे, रोहन सूर्यवंशी, लक्ष्मण जाधव, शरद सोनवणे, पप्पू सुरडकर यांच्यासोबत अधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.