संविधानाला धक्का लागल्यास राजीनामा देईल -आठवले

0

पुणे :- देशात भाजपाला विरोधकांकडून जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे काम चालू आहे. भाजपामुळे राज्य घटनेला किंवा दलितांच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. जर आंबेडकरांच्या संविधानाला धक्का लागल्यास तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईल, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (आठवले गट) घेतलेल्या राज्यस्तरीय अधिवेशन सांगितले.

आठवले म्हणाले, रिपाइंने भाजपसोबत युती केली आहे. भाजपकडून राज्यघटनेत कोणताही बदल केला जाणार नसल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे. मात्र, काही राजकीय पक्ष चुकीचा प्रचार करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी संविधान बचावासाठी मोर्चे काढत आहेत. मात्र, त्यांना आता कॉंग्रेस बचाव म्हणण्याची वेळ आली आहे. संविधान वाचविण्यासाठी मी आणि पंतप्रधान मोदी सक्षम आहोत. त्यामुळे आगामी निवडणुका भाजपसोबत लढविल्या जातील. तसेच आगामी निवडणुकीत शिवसेनेने भाजपाबरोबर युती करावी, अशी पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा तळागाळातल्या लोकांचा पक्ष असून तो कार्यकर्त्यांच्या फळीमुळे उभा आहे. मी केवळ भाषण करून इथपर्यंत आलो नाही, तर कार्यकर्त्यांच्या जोरावर आलो आहे. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पक्ष विस्तारला असून पक्षाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारातला भारत उभा करायचा आहे. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्यायराज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्‍ता टिळक, खासदार आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आमदार राहुल कुल, अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष एम. डी. शेवाळे, प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, रिपब्लिकन मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हणमंत साठे, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.