आमदार महेश लांडगे यांची नवनगर प्राधिकरण अध्यक्षांकडे मागणी
पिंपरी चिंचवड : देशातील पहिले संविधान भवन औद्योगिकनगरीत उभारण्यात यावे, याकरिता पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने मोकळ्या भूखंडाची जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. संविधान दिनानिमित्त सर्वत्र संविधानाचा जागर केला जात आहे. यानिमित्ताने आमदार महेश लांडगे यांनी सोमवारी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांची भेट घेऊन संविधन भवनासाठी जागा देण्याची मागणी केली. यावेळी महापौर राहुल जाधव, नगरसेवक विकास डोळस, लक्ष्मण उंडे, सागर गवळी, राजेंद्र लांडगे, कुंदन गायकवाड, उत्तम केंदळे, नगरसेविका भीमाबाई फुगे, हिराबाई घुले, साधना मळेकर, सुवर्णा बुर्डे, स्वीनल म्हेत्रे, कमल घोलप, यशोदा बोईनवाड, निर्मला गायकवाड, नम्रता लोंढे, सारिका लांडगे, योगिता नागरगोजे आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवडला मिळणार मान…
हे देखील वाचा
आमदार लांडगे म्हणाले, संविधानाविषयी प्रत्येक भारतीयाला साक्षर करणे गरजेचे आहे. त्यासाठी देशात पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवड शहरात उभा रहावे, याकरिता नवनगर विकास प्राधिकरणातील जागेची मागणी केलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले आहे. संविधानामुळे आपला भारत देश एकसंध आहे. या संविधानाविषयी प्रत्येक भारतीयाला साक्षर करण्याची आवश्यकता आहे. भारतात कोठेही ‘संविधान भवन’ नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराला त्याचा मान मिळणार आहे. शहराच्या मध्यभागात संविधान भवनाची उभारणी झाल्यास संविधानाविषयी निश्चित अभिमान असणार आहे.
अशा असतील सुविधा…
दरम्यान, प्रस्तावित संविधान भवनामध्ये संविधान अभ्यास केंद्र असणार आहे. त्यामध्ये तज्ज्ञांचे संविधानावर अभ्यास वर्ग, कार्यशाळा घेतल्या जातील. याशिवाय इतर राष्ट्रांच्या घटना तुलनात्मक अभ्यासासाठी उपलब्ध असतील. ‘ई’-लायब्ररी, संविधानविषयी विविध पैलू चित्रकला दालन, यूपीएससी, एमपीएससी अभ्यासिका व अभ्यासवर्ग सुरु करण्यात येणार आहे.