संवेदना जाग्या ठेवून डोळसपणे जगाकडे पहा : डॉ. ढेरे

0

हुजूरपागा प्रशालेत रंगला संवाद

पुणे । तुमच्या संवेदना जाग्या ठेवा, डोळसपणे जगाकडे पहा. खूप वाचा. विचार करा. आयुष्याला सुंदर करणार्‍या खूप गोष्टी तुमच्या हाती लागतील, त्यासाठी पुस्तकांचे पंख लावून उंच भरारी घ्या, असा सल्ला प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी विद्यार्थिनींना दिला.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमात हुजूरपागा प्रशालेतील विद्यार्थिनींशी त्यांनी संवाद साधला. यावेळी प्रा. मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार, दीपक करंदीकर, मुख्याध्यापिका सीमा झोडगे, उपमुख्यध्यापिका मंगला वाघमोडे, हेमा भूमकर उपस्थित होत्या. डॉ. ढेरे म्हणाल्या, मला कविता अगदी लहान वयातच भेटली. याच शाळेत मी शिकले आणि इथल्या शिक्षकांनी मला लेखनासाठी खूप उत्तेजन दिले. मआज मला साहित्यक्षेत्रातील कामगिरीबद्दल अनेक पुरस्कार मिळाले पण त्यावेळी ५ रुपयांचे बक्षीस देऊन बाईंनी दिलेली शाबासकी हा मला सर्वात मोठा पुरस्कार वाटतो.

प्रा. जोशी म्हणाले, आयुष्याच्या सीईटीमध्ये यशस्वी होण्यासाठी साहित्य नक्कीच तुम्हाला भावनिक बळ देईल. व्यक्तिमत्त्व भावसंपन्न करणार्‍या साहित्याशी मैत्री करा. मनीषा राऊत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.