रोटरीच्या वतीने गोवर व रुबेला च्या माहितीसाठी जनजागरण कक्ष
अंबाजोगाई : संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. संसर्गजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय पाळणे गरजेचे आहे. असे आवाहन स्वा. रा. ती. वैद्यकीय महाविद्यालयातील मेडीसीन विभागाचे प्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या वतीने गणेश विसर्जनानिमित्त समाजात गोवर व रुबेला या रोगांबद्दल जनजागृती कक्ष स्थापन करण्यात आला होता. या कक्षाचे उद्घाटन डॉ. सिद्धेश्वर बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे, डॉ प्रदीप दामा, रोटरीचे अध्यक्ष प्रविण चोकडा, प्रा. डी. एच. थोरात, डॉ. सुरेश आरसुडे, प्रतिभा देशमुख, सुहास काटे, डॉ. निशिकांत पाचेगावकर, संतोष मोहिते, भागवत कांबळे, अनिल केंद्रे, अंगद कराड, बाबुराव बाभुळगावकर,दिलीप देशपांडे, प्रदीप झरकर उपस्थित होते.
यावेळी डॉ. सिद्धेश्वर बिराजदार यांनी साथींच्या रोगांचे निर्मूलन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. रोटरीच्या वतीने गोवर व रुबेला या रोगांवर सुरू असलेली जनजागृती ही समाजहिताची आहे. अशा आजारांची माहिती समाजापर्यंत पोहचली तर त्या संदर्भातील लसीकरण होणे सोयीचे ठरते. शहरवासियांनी अशा लस डॉक्टरांकडून घ्याव्यात असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष मोहिते यांनी केले. संचालन जगदीश जाजू यांनी तर उपस्थितांचे आभार प्रविण चोकडा यांनी मानले. यावेळी रोटरी क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी रोटरी क्लबच्या वतीने शहरतील सर्व गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले.