राजगुरूनगर । संस्कारधन बालवाडीचे स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात संपन्न झाले. छत्रपती आमुचे दैवत छत्रपती, कोळी वाड्याची मी गं लेक, मी डोलकरं-दर्याचा राजा, ए आई मला पावसात जाऊ दे अशी विविध बडबड गीते आणि बालनृत्यांनी स्नेहसंमेलनाला रंगत आणली होती.
येथील आनंदी-आनंद मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ ग्रामीण साहित्यीक बबन पोतदार, विजय सातपुते, माजी सरपंच प्रदीप कासवा, नगरसेविका सुरेखा श्रोत्रिय, मुख्याध्यापिका वसुधा खेडकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात संस्कारधन बालवाडीचे लहानगट, मधलागट आणि मोठागट आदी सर्व विभागातील विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात सादर केलेल्या कोळीनृत्य, मल्हारनृत्य तसेच बडबडगीतांना श्रोत्यांनी दाद दिली. कार्यक्रमाचे संयोजन स्मिता खुडे, अर्चना पालीवाल, अलका राऊत यांनी केले. संस्थेच्या कार्याचा परिचय व प्रास्ताविक मुख्याध्यापिका वसुधा खेडकर यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन अश्विनी भालेराव यांनी केले.