संस्कारभारतीच्या पाऊसगीतांनी जळगावकर चिंब!

0

जळगाव। संस्कारभारतीच्या मातृशक्ती विभागातर्फे महिलांसाठी पारंपारीक गीते व लोकनृत्यांची स्पर्धाचा समावेश असलेल्या ‘ पाऊसगाणी’ कार्यक्रम रविवारी मायादेवी नगरातील रोटरी हॉल येथे आयोजित करण्यात आला. संस्कारभारतीतर्फे आयोजित या कार्यक्रमात गीत, नृत्यांच्या श्रावणोत्सवात अन् पाऊसगीतांच्या बहारदार सादरीकरणाने जळगावकर रसिक चिंब भिजले.

11 महिला संघांचा होता सहभाग
प्रारंभी संस्कारभारतीच्या देवगिरी प्रांत कार्यकारीणी सदस्य सुनंदा सुर्वे, शहर उपाध्यक्षा चित्रा लाठी, विभागप्रमुख वृषाली देशपांडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. विविध स्पर्धांचे परिक्षण शरद भालेराव, मीना सैंदाणे, वंदना गोखले यांनी केले. वैशाली पाटील यांनी रसाळ वाणीने पावसाची व्याख्या उलगडत प्रभावी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात 11 महिला संघांनी सहभाग नोंदवला होता. तर 13 गायक गायिकांनी बहारदार हिंदी पाऊसगाणी सादर करुन रसिकांची मने जिंकली.

यांना मिळाली पारितोषिके
संस्कारभारती आयोजित पाऊसगाणी स्पर्धात्मक उपक्रमात जिल्हाभरातून विविध महिला संघांनी सहभाग नोंदविला. यास्पर्धेत सुमनांजली ग्रुप प्रथम, आनंदी महिला मंडळ द्वितीय तर कंडारी (भुसावळ) येथील भक्ती महिला मंडळाला तृतीय क्रमांकाच्या पारीतोषिकाने गौरवण्यात आले. या वेळी महिलांनी नृत्याद्वारे कानबाई, चैत्रगौर, मंगळागौर या सणांची माहिती दिली.