संस्कार ग्रुपविरोधात महिलांचे उपोषण

0

पिंपरी-चिंचवड : तीन वर्षात दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून महिला बचतगटांची फसवणूक करणार्‍या संस्कार ग्रुपवर आठ दिवसात कारवाई करून आरोपींना बेड्या ठोकाव्यात यासाठी फसवणूक झालेल्या माहिलांनी दिघी पोलीस ठाण्याबाहेर मंगळवारपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. आज या महिलांना बळजबरीने पोलिसांकडून वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत असल्याचा आरोप बुधवारी या महिलांनी केला आहे.

पोलिसांकडूनच उलट-सुलट प्रश्‍न
आळंदी येथील संस्कार ग्रुपने तीन वर्षात दुप्पट पैसे देण्याचे अमिषाला बळी पडून महिला बचतगटांनी या संस्थेत पैसा गुंतवला. मात्र, मुदत संपूनही पैसे परत मिळाले नाहीत.असा आरोप करत महिलांनी जानेवारी 2017 मध्ये दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र त्या तक्रारींवर कोणतीही कारवाई पोलिसांकडून करण्यात आलेली नाही. चौकशीच्या नावाखाली फसवणूक झालेल्या महिलांनाच उलट-सुलट प्रश्‍न विचारले गेले. या घोटाळ्यामध्ये महिला बचतगटाचे कोट्यवधी रुपये बुडाले असल्याचेही या महिलांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी आठ दिवसाच्या आत कारवाई करावी अशी मागणी यावेळी या बचतगटातील महिलांनी केली आहे. यासंदर्भात महिलांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनाही निवेदन दिले आहे.