संस्कृतच्या प्रचार व प्रसारासाठी विद्यार्थ्यांचे बाजारात अनोखे मार्केटींग

0

भाजीपाल्यासह फळांची संस्कृत संभाषणातून विक्री : साने गुरूजी विद्यालयात सप्ताहाचा समारोप

अमळनेर- बोलायला तसेच समजून घ्यायला काहीशी अडचणीची वाटणार्‍या संस्कृत भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी अमळनेरच्या साने गुरूजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या भाषेची जनतेत आवड निर्माण होण्यासाठी शनिवारी शहरातील लुल्ला भाजीपाला बाजारात जावून अनोखे मार्केटींग केले. व्यापार्‍यांकडील फळांसह भाज्यांची नावे संस्कृतमध्ये घेवून ग्राहकांशी संवाद साधण्यात आला. नेहमीच मिळमिळीत शब्दांचा उच्चार ऐकणार्‍या ग्राहकांना विविध फळांसह भाज्यांची नावे ऐकून सुरुवातीला हसायलाही आले तर जिज्ञासेपोटी अनेकांनी नेमकी बाबही जाणून घेतली. त्यात अद्रकला आद्रकम्, सफरचंदाला सेवम, गिलक्याला जलिनी, कोथंबिरला धान्यकम् आदी नावे ऐकल्यानंतर ग्राहकांनी आपसुकच दुकानांभोवती गर्दी केली तर ग्राहकांची वाढती गर्दी व उत्साह पाहून भाजीपाला विक्रेतेही सुखावले.

संस्कृत सप्ताहाच्या समारोपानिमित्त विविध कार्यक्रम
शहरातील साने गुरूजी नूतन माध्यमिक विद्यालयात सुरू असलेल्या संस्कृत सप्ताहाचा शनिवारी समारोप झाला. सप्ताहादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शविारी सकाळी नऊ ते 11 या वेळेत आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी भाजी बाजारात संस्कृतचा प्रचार व प्रसार वाढण्यासाठी भाजीपाल्यासह फळांना संस्कृतमध्ये म्हटल्या जाणार्‍या शब्दांचा फलक लावून ग्राहकांचे लक्ष आकर्षित केले. याप्रसंगी अवघ्या दोन तासात दोन हजारांची रक्कम जमा झाल्याने भाजीपाला विक्रेत्यांच्या चेहर्‍यावर आनंदाची लहरही उमटली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव संदीप घोरपडे व उपप्राचार्य सुनील पाटील तसेच शिक्षक वृंदांनी उपस्थिती दिली. इंग्रजी व संस्कृत विभागाच्या शिक्षिका शारदा त्र्यंबक उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. व्यापारी सलिम टोपी यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.

महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन
संस्कृत सप्ताहानिमित्त शनिवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत विद्यालयाच्या एस.एम.सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात संस्कृतमध्ये गीत, गोष्ट, पोवाडा सादर करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तसेच संस्कृत संमेलन भरवून निबंध स्पर्धाही घेण्यात आल्या. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. प्रसंगी प्रमुख अतिथी सचिव संदीप घोरपडे, प्राचार्य सुनील पाटील, शिक्षक डी.ए.धनगर, डी.वाय.पाटील, आर.एम.देशमुख, डी.ए.महाजन आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन नववीचा विद्यार्थी यश अहिरराव, दहावीचा विद्यार्थी सौरभ पाटील यांनी तर दहावीचा विद्यार्थी मयुर साळुंखे यांनी मानले. संस्कृत सप्ताहाचे यशस्वी नियोजन इंग्रजी व संस्कृत विभागाच्या शिक्षिका शारदा त्र्यंबक उंबरकर यांनी केले.