संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

0

मुंबई । संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या नैतिक शिक्षण उपक्रमाचा पारितोषिक वितरण कार्यक्रम घाटकोपर पूर्वेच्या झवेरबेन पोपटलाल सभागृहात नुकताच संपन्न झाला. उद्योजक आणि समाजसेवक सुरेश भाखानी यांच्या हस्ते नैतिक शिक्षणाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या मुलुंडच्या विद्या प्रबोधिनी इंग्रजी शाळेला आदर्श शाळा चषक आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले. बाळासाहेब हांडे यांच्या हस्ते सरस्वती विद्यालय कांजूरमार्गच्या मुख्याध्यापिका पदमा जोशी यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी 50 ग्रॅमचा चांदीचा शिक्का, प्रमाणपत्र, शाल देऊन सन्मानित करण्यात आले.

कल्पांगण संस्थेकडून श्रीकृष्ण लीला नृत्यनाटिकेचे सादरीकरण
राष्ट्रपतींच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवणारे नागोजीराव तायडे यांच्या हस्ते शिक्षिका तृप्ती दवे, प्रियांका शिंदे, सुनेत्रा सावंत, सुरेखा साळुंखे, शुभदा गोरे याना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रतिष्ठानचे विश्‍वस्त मोहन साळेकर यांनी उपस्थितांना संस्थेच्या कार्याची ओळख करून दिली. यावेळी कल्पांगण संस्थेच्या कलाकारांनी सादर केलेल्या श्रीकृष्ण लीला या नृत्यनाटिकेने सर्वांची वाहवा मिळवली. यावेळी ईशान्य मुंबईतील शाळातील गुणवंत विद्यार्थ्यांना सोनेरी मेडल देऊन त्यांना शैक्षणिक क्षेत्रात उंच भरारी घेण्यासाठी संस्थेकडून प्रोत्साहित करण्यात आले.