सकल जैन वर्षायोग समितीच्यावतीने दशलक्षण पर्व महोत्सवास प्रारंभ

0
रागावर नियंत्रण मिळविण्यासाठी चेहर्‍यावर नेहमी हास्य ठेवा
पूलकसागर महाराज यांनी केले मार्गदर्शन
निगडी : आपल्याला मनुष्य जीवन मिळाले आहे. त्याचा सदुपयोग करून चांगले नाव, कीर्ती मिळवून या जगाचा निरोप घेतला पाहिजे. मात्र चांगला माणूस म्हणून आपले नाव मागे राहिले पाहिजे. हे आपल्यात उत्पन्न होणार्‍या रागाला कुलूप ठोकल्याशिवाय शक्य नाही. रागाला आवरा. रागावर नियंत्रण मिळविण्यासाठी चेहर्‍यावर नेहमी हास्य ठेवा, असे मत पूलकसागर महाराज यांनी मत व्यक्त केले. निगडी प्राधिकरण येथे सकल जैन वर्षायोग समितीच्यावतीने दशलक्षण पर्व महोत्सवास आजपासून प्रारंभ झाला आहे. त्याच्या प्रारंभाच्या उत्तम क्षमा या विषयावर ते बोलत होते.
आरोग्यासाठी हितावह
पूलकमहाराज पुढे म्हणाले की, रागावर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वतःच्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी हितावह ठरेलच. कौटुंबिक वातावरणही उल्हसित आणि प्रसन्न ठेवणारे ठरेल. क्रोधाची सुरुवात मुर्खतेपासून होते आणि पश्‍चातापावर संपते. पश्‍चाताप करून घ्यायचा नसेल तर शांत राहणं कधीही चांगलं. आपले काम शांतपणे त्याला समजावून सांगा. नसेल तर नंतर भेट घ्या. संतप्त व्यक्तीवर मात करण्यासाठी हा सगळ्यात सोपा आणि चांगला मार्ग आहे. रागाचा फक्त एक क्षण आपण सहन करू शकलो, तर दुःखाच्या अगणित दिवसांपासून आपला बचाव होऊ शकतो. मात्र तोच रागाचा क्षण आपण सहन करू शकलो नाही तर तो आपले सर्वस्व संपवून टाकतो. राग व्यक्त करणार्‍या व्यक्तींच्या काही गोष्टीही आपण समजून घेतल्या पाहिजेत. त्याला राग का आला आहे. त्याचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन आपल्याला ओळखता आला पाहिजे. क्रोध महाग करा व हास्य स्वस्त करा.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
यावेळी पर्युषण पर्वाचे विविध धार्मिक कार्यक्रम सकाळी झाले. यावेळी भगवान महावीर यांच्या  मूर्तीचा अभिषेक  करण्यात आला. यावेळी सकल वर्षा योग समितीच्या अध्यक्षा शोभा धारीवाल, उपाध्यक्ष अजित पाटील, मिलिंद फंडे,  वीरेंद्र जैन, भूपाल बसन्नावार, सुरगोंडा पाटील,  चकोर गांधी, सुदीन खोत, विजय भिलवडे, संजय नाईक, जितेन शहा, वीरकुमार शहा, सुजाता शहा, प्रकाश शेडबाळे आदी उपस्थित होते.