वाघळूद जि.प.प्राथ.शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
भुसावळ- विद्यार्थ्यांवर सकारात्मक संस्कार प्राथमिक शिक्षणादरम्यानच होत असतात, बालवयात मनावर कोरलेले संस्कार आयुष्यभर तसेच राहतात. अगदी बालपणापासून विद्यार्थ्यांच्या अंगी असणार्या कलागुणांना शालेय स्नेहसंमेलनातून वाव मिळतो, असे मत अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केले. यावल तालुक्यातील वाघळूद येथे जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते.
अंतर्नाद शाळेला संगणक देणार
संदीप पाटील पुढे म्हणाले की, अभ्यासक्रमातील शिक्षण घेत असतांनाच विद्यार्थ्यांनी आपल्या अंगीभुत सुप्तगुणांना वाव देण्यासाठी अशा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेणे आवश्यक आहे. शाळेला अंतर्नाद प्रतिष्ठानच्यावतीने एक संगणक देण्याचे त्यांनी जाहीर केले. कार्यक्रमात प्रदीप सोनवणे यांनी शाळेला एक हजारांची देणगी दिली. प्रमुख पाहुणे म्हणून योगेश इंगळे, प्रदीप सोनवणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश धनगर, उपाध्यक्ष कल्पना पवार, पोलिस पाटील समाधान अडकमोल यांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांनी जिंकली मने
याप्रसंगी शाळेतील चिमुकल्यांनी ग्रुप डान्स, सोलो डान्स, त्याच बरोबर वृक्ष लागवडीसंदर्भात मुक नाटीका, स्वच्छता अभियानातून जनजागराचा संदेश दिला तसेच बेटी बचाओ या संवेदनशील विषयावर एक नाटीका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. युवा ग्रुप, मुख्याध्यापक अमितकुमार पाटील, सहशिक्षक दिीपक वारके यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर वृंदानी परीरश्रम घेतले.