सखाराम महाराजांच्या जयघोषणाने अमळनेर नगरी दुमदुमली

0

अमळनेर । खानदेशातील शेवटची यात्रा असणार्‍या अमळनेर येथील संत सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त लालजींच्या रथाची भव्य मिरवणूक गुरुवारी सायंकाळी 8:00 ला निघाली त्यानंतर हि रथ मिरवणूक पूर्ण होऊन पहाटे परत संस्थानात दाखल होईल. अमळनेर येथील संत सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त लालजींच्या रथाची भव्य मिरवणूक निघते. संपूर्ण खानदेशातील आकर्षण असलेला रथोत्सव शांततेत पार पडला. लालजी म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांची मूर्ती या रथात सामावालेली होती. अक्षय्यतृतीयेपासून संत सखाराम सखाराम महाराज यात्रा उत्साहात सुरु झाली आहे. विविध कार्यक्रम साजरे होत असताना रथोत्सव गुरुवारी सायंकाळी आठ वाजता सपत्नीक विधिवत पूजा जयदेव व संध्यादेव यांनी केली. यावेळी हभप प्रसाद महाराज, मोहन महाराज बेलापूरकर, यांच्या उपस्थितीत रथावर पूजा करून मुर्त्या विधिवत विराजमान करण्यात आल्या. रथावर बसण्याचा मान ब्रम्हे व वैद्य पुजारी यांना आहे. त्याप्रमणे ते स्थानापन्न झाले. भेर व तुतारीच्या निनादात वाजत गाजत संस्थान मंदिराजवळून रथाची मिरवणूक सुरुवात झाली.

भाविकांची अलोट गर्दी
रथाच्या पुढे भगवे ध्वजधारक दोन घोडेस्वार होते. त्याच्यापाठोपाठ वारकरी मंडळी होती. ट्रॅक्टरवर नगारे होते. सोबतच अब्दागिरीधारक सेवेकरी व मशालधारी सेवेकरी होते. लेझीम मंडळ जल्लोषपूर्ण नृत्य, रथाच्या मागे लहान गाड्यावर महाराजांच्या चांदीच्या पादुका व मुखवटा ठेवण्यात आले होते. रस्त्यावर दुतर्फा भाविकांना श्रीफळ,केळी, खडीसाखरेचा प्रसाद देण्यात आला. रस्त्यावर ठिकठिकाणी प्रसाद महाराजांवर व रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. ठिकठिकाणी आरत्याही झाल्या. भेर व तुतारीच्या निनादात वाजत गाजत संस्थान मंदिराजवळून मिरवणूक सुरुवात झाली. सायंकाळी निघालेला हा रथ पानखिडकी, सराफ बाजार, बोरीनदीतून पैलाड, मातंगवाडा, कसाली मोहल्ला मार्गे पहाटे परत वाडी संस्थानात परततो.

सर्व समाजांचे योगदान
पहिली मोगरी मुस्लीम बांधवाची -पहिली मोगरी रथाला लावत त्याला मुस्लीम बांधव हलवतो. त्यानंतर देशमुख, पाटील, धनगर समजाला रथ सुरक्षित आणण्याची जबाबदारी असते. समाधीजवळ मंडप उभारण्याचा मान माळी समजाला असतो. तर पालखीचे मेने वाहण्याचा मान भोई समजाला असतो. घोडेस्वार, भगवे झेंडे, भालदार चोपदार यामुळे मिरवणुकीची शोभा वाढते. सर्वधर्मीय रथोत्सव हा अमळनेर शहराच्या एकात्मतेचा आणि बंधुभावाचा प्रतिक आहे. याठिकाणी प्रत्येक समाजाला स्थान देण्यात आले आहे. यात्रोत्सवामुळे यात्रा परिसर आज सायंकाळी गजबजणार आहे. सायंकाळी लालजींच्या दर्शनसाठी शहरातील व ग्रामीण भागातील वारकरी संप्रदायाचे भाविक हजर राहून दर्शन घेतात. आद्य सखाराम महाराज यांच्या पादुकांना देखील श्रद्धेने स्पर्श करून भाविक आपले आत्मिक समाधान करून घेत असतात. मोहन महाराज बेलापूरकर यांचे आगमन झाल्यानंतर यात्रोत्सवाला सुरुवात होत असते. 15 दिवस चालणारा हा यात्रोत्सव गावात चैतन्य निर्माण करणारा असतो.

200 वर्षांची परंपरा
यात्रोत्सवानिमित्त 17 पोलिस अधिकार्‍या संमवेत सुमारे 200 पोलिसांच्या वाढीव बंदोबस्ताला पूरक म्हणून साध्या गणवेशातील 40 पोलिस पाटील सह अमळनेर पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर त्यांच्या सोबत वाढीव पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रथोत्सव,वैशाख शु.॥11 ॥ मोहिनी एकादशी ह्या दिवशी दुसरे गादी पुरुष गोविंद महाराज यांनी 1819 मध्ये म्हणजे 200 वर्षांपूर्वी सुरू केलेला उत्सव आजही तेवढ्याच उत्साहात सुरू आहे. मलबार सागवान लाकडापासून टनोगंती वजन असलेला रथ दोन चाकांमधिल जोडणारे आक हे अंजनाच्या लाकडांपासून बनवले आहे, वाडीचौक ते सराफ बाजार ,दगडी दरवाजा ,फरशी रोड, पैलाड गावातून बोरीपात्रातून किल्ला चौक मार्गे वाडी चौक असा अंदाजे 3 ते 4 की.मी.अंतराचा मार्ग रथ ओढण्यासाठी दोर म्हणजे जाड नाडा बांधून हजारो भक्तांचे हाथ लावून हा रथ ओढतात त्यास रस्त्यावर दिशा मार्ग क्रमण व थांबा हे सर्व अंदाजे 40 किलोच्या लाकडी मोगर्‍या लावणारे वसंत धनगर, शिवराम धनगर, गुलाब धनगर, भूषण देसले, सुभाष धनगर, आधार धनगर, धनराज पाटील, लक्ष्मण देसले, दिलीप पाटील, विश्‍वास पाटील ,देवराम धनगर, शांताराम पाटील,आधार धनगर, भक्त करतात. काही ठिकाणी रस्त्यांवर वाहन देखील थांबवू शकत नाही तेथे शर्तीने मोगरी धारक रथाला योग्य दिशा व ब्रेक देतात आणि निघतांना पश्‍चिम दिशा नंतर उत्तर दिशा व नंतर दक्षिण दिशेने रथ मार्ग ही 200 वर्षांची परंपरा आजतागायत सुरू आहे.सायंकाळी 8:00 वाजता मार्गस्थ झालेला रथ दुसर्‍या दिवशी सकाळी 8:00 वाजता जागेवर परत येतो. लाखोंच्या संख्येत भक्त दर्शन घेतात या रथाला पहिली मोगरी लावण्याचा मान मुस्लिम समाजाचे सलीमोद्दीन कमरोद्दीन बेलदार यांना दिला. आजही ही परंपरा सुरू आहे.

यांची होती उपस्थिती
आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिताताई वाघ, धुळे लाच लुचपत विभागाचे डी. वाय. एस. पी.शत्रुघ्न माळी, डीवायएसपी रफिक शेख,तहसिलदार प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, जि.प.सदस्या माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील,माजी नगराध्यक्ष सुभाष दादा भांडारकर,डॉ. अनिल शिंदे,सर्व नगरसेवक नगरसेविका यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे,आणि सामाजिक कार्यकर्ते,व्हाट्सप गृप माझं गांव माझं अमळनेर सह इतर असंख्य मान्यवर उपस्थित होते.