पिंपरी- प्रेमविवाह केल्याचा राग डोक्यात धरून भावानेच तरुणीचे अपहरण केले. या प्रकरणी तरुणीच्या भावासह त्याच्या अन्य साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना रविवारी (दि. 4) मोरवाडी येथे घडली. रवी वसंत वावरे (वय 32, रा. मोरवाडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महेश विष्णू लवटे (वय 22, रा. पनवेल, रायगड) याच्यासह अन्य तीन ते चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वावरे यांनी एक महिन्यापूर्वी तरुणीच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन तिच्याशी प्रेमविवाह केला आहे. हा विवाह तरुणीचा भाऊ आरोपी महेश याला देखील मान्य नव्हता. रविवारी महेशने भेटण्याचे कारण सांगून तरुणीला इमारतीच्या पार्किंगमध्ये बोलावून घेतले. पुन्हा घरी येण्यासाठी महेशने तरुणीचे मन वळवण्याचा खूप
प्रयत्न केला. मात्र तरुणीने त्याच्यासोबत घरी येण्यास स्पष्ट नकार दिल्याने महेशने साथीदारांच्या मदतीने तिला जबरदस्ती मोटारीत बसवून पळवून नेले. पिंपरी पोलिसांनी तरुणीचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास उपनिरिक्षक बोचरे करीत आहेत.