दुधाच्या प्रश्नावरून शिवसेनेच्या दुटप्पी धोरणावर अजित पवार यांचा प्रहार
नागपूर – एकीकडे दुधाला भाव मिळाला पाहिजे म्हणून ओरड करायची आणि दुसरीकडे यांचे मंत्री सरकारमध्ये त्यामुळे असे दुटप्पी राजकारण शिवसेनेने करु नये अशी टिका शिवसेनेवर करतानाच तुम्हाला दुधाला भाव पाहिजे असेल तर आपण सगळयांनी मिळून या सरकारला वठणीवर आणूया अशी ऑफरही विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेनेला दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी दुधाला हमी भाव मिळण्यासाठी विधानभवनचा परिसर घंटानाद करुन दणाणून सोडला. त्यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेनेचे आमदारही सहभागी झाले होते. त्यामुळे अजित पवार यांनी शिवसेनेच्या या दुटप्पी भूमिकेवर मिडियाशी बोलताना जोरदार हल्लाबोल केला. एकीकडे सभागृहात दुधाला भाव मिळायला पाहिजे म्हणून आंदोलन करायचे आणि दुसरीकडे सत्तेची ऊबही घ्यायची आणि लोकांना दाखवायचं की आमचा नाणारला विरोध आहे. दुधाला दर देण्याकरीता पाठिंबा आहे हे चुकीचे आणि शेतकऱ्यांना फसवण्याचे काम शिवसेनेचे करत आहे असा आरोपही पवार यांनी केला.
हे देखील वाचा
शेतकऱ्यांना जगवणाऱ्या धंदयाकडे दुर्लक्ष योग्य नाही
दुष्काळ परिस्थितीत, अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना जगवणारा दुधाचा धंदा असून सरकारने याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. सरकार शेतकऱ्यांना समाधानी करण्यास कमी पडत आहे अशी टिका अजित पवार यांनी केली. दुध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचा हमीभाव मिळावा यासंदर्भात मांडण्यात आलेल्या स्थगन प्रस्तावावर अजितदादा बोलत होते. ते म्हणाले कि, राज्यभर दुध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दुधाच्या संदर्भात अध्यक्षांच्या उपस्थितीत पावणे तीन वर्षांपूर्वी एक बैठक झाली होती. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही. दुधाच्या पावडरला ३ रूपये तर दुधाला ५ रूपये देण्याची मागणी आहे. पण सरकार वेळ मारून नेण्याचे काम करत आहे. हे काही बरोबर नाही असा आरोपही अजित पवार यांनी केला.
दुधाची पिशवी विकणाऱ्याएवढेही कमिशन शेतकऱ्याला नाही
जे दुध तयार करुन पिशवीतून किंवा बाटलीतून मुंबईला जाते तिथे विक्री करणाऱ्याला ५ रुपये कमिशन मिळते परंतु आमच्या शेतकऱ्याला लिटरला जेवढा खर्च येतो तेवढे देखील मिळत नाही ही आजच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांची शोकांतिका झाली आहे अशी खंत पवार यांनी व्यक्त केली. शेतकऱ्याला गायीचे दुध तयार करण्यासाठी २५ ते ३० रुपये लिटरला खर्च येतो आणि त्यातून शेतकऱ्याला १७ ते २१ रुपये मिळतात. सरकार जी काही घोषणा करते त्याची अंमलबजावणी नीट करत नाही आणि त्याचा फायदाही शेतकऱ्याला होत नाही. त्यामुळे कर्नाटक आणि गोवा राज्य दुधाला लिटरला ५ रुपये थेट अनुदान देते तसं अनुदान महाराष्ट्रातील दुध उत्पादक शेतकऱ्याला थेट देण्यात यावे अशी मागणी अजित पवारांनी केली. भाजप सरकार दुध संघाचे लोक चुकीचं वागत आहेत असे सांगत आहेत परंतु गेली चार वर्ष हे सरकार सत्तेवर आहे. मात्र काही अडचण आली की सहकारी चळवळीच्या नावाने बोटे मोडण्याचे काम करत आहे असाही आरोप पवार यांनी केला.