औरंगाबाद-अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे याच्या औरंगाबादेतील मित्राकडून ७.६५ बोअरचे पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे. या पिस्तुलाद्वारेच दाभोलकर यांची हत्या केल्याचा संशय सीबीआय आणि एटीएस या तपास पथकांनी व्यक्त केला आहे.
राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने औरंगाबादमधून सचिन अंदुरेच्या तीन मित्रांना ताब्यात घेतले आहे. मंगळवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली असून तिघांच्या घरातून काही संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे. यामध्ये या पिस्तुलाचाही समावेश आहे.
दरम्यान, तपास पथकांनी या प्रकरणी महाराष्ट्राबाहेरील ठिकाणांचीही पाहणी केली आहे. याप्रकरणी ज्या संशयीतांच्या घरातून स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. त्यांनी इंटरनेटवरून बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतल्याचेही तपास पथकाच्या चौकशीत समोर आले आहे.
या संपूर्ण चौकशीदरम्यान सुरुवातीला या शस्त्रसाठ्याचा वापर मराठा मोर्चात घातपातासाठी असल्याचा संशय तपास पथकांकडून व्यक्त करण्यात आला होता. मात्र, मराठा मोर्चासाठी या हत्यारांची जमवाजमव केल्याची माहिती अद्यापपर्यंतच्या तपासातून स्पष्टपणे पुढे आलेले नाही.