मुंबई । दरवर्षी भारतात रस्ते अपघातात हजारो बळी जातात. दरवर्षी रस्ते अपघात टाळण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. रस्ते वाहतुकीच्या नियमांबद्दल जनजागृती वाढावी, यासाठी रस्ते वाहतूक सुरक्षा सप्ताहाचेदेखील आयोजन केले जाते. मात्र तरीही तरुणाई नियमांकडे दुर्लक्ष करुन अपघातांना निमंत्रण देते. अपघातावेळी डोक्याचे संरक्षण करणारे हेल्मेट असंख्य तरुणांना डोक्यावरील ओझे वाटते. त्यामुळेच आता सचिन तेंडुलकरने रस्त्यावरुन हेल्मेटशिवाय प्रवास करणार्या तरुण दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्याचा सल्ला दिला आहे. दुचाकी चालवताना कायम हेल्मेटचा वापर करा, असे सचिन तेंडुलकरने त्याची गाडी सिग्नलवर थांबलेली असताना शेजारील दुचाकीस्वारांना सांगितले.
तेंडुलकरने व्हिडिओ केला ट्विट
भारताचा महान क्रिकेटपटू असलेल्या सचिन तेंडुलकरने एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यामध्ये सचिन तेंडुलकरची गाडी रस्त्यात थांबलेली दिसते आहे. तर सचिन तेंडुलकरच्या गाडीच्या बाजूला एका दुचाकीवरुन दोन तरुण हेल्मेटशिवाय प्रवास करताना दिसत आहेत. सचिनने या दोन्ही तरुणांना हेल्मेट वापरण्याचा सल्ला दिला. स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरा, असे सचिनने या दोन तरुणांना सांगितले.