मुंबई । शिक्षण सचिव नंदकुमार यांची शिक्षण सचिव पदावरून हकालपट्टी केल्यानंतर शिक्षक आमदार नागो गाणार यांच्यासह विविध पक्षांनी निर्णयाचे स्वागत केले आहे. यासंदर्भात आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन केले. नंदकुमार यांनी आपल्या कार्यकाळात शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव म्हणून आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडले नव्हते. त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे शिक्षण क्षेत्रातील प्रशासन संपुष्टात आले आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्राचा पूर्ण बट्ट्याबोळ झाला, असा आरोप गाणार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केला आहे.
नागो गाणार यांनी मुख्यमंत्र्याचे आभार मानताना पत्रात म्हटले आहे की, नंदकुमार यांच्या अनेक निर्णयामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे नंदकुमार यांची तत्काळ हकालपट्टी व्हावी, यासाठी वारंवार मी आपल्याकडे मागणी करत होतो. त्याची दखल घेऊन आपण नंदुकमार यांना शिक्षण क्षेत्रातून काढले त्याबद्दल आभार.
यासोबतच गाणार यांनी पत्रात नंदकुमार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा उल्लेख केला आहे. त्याची दखल आता नव नियुक्त शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी घ्यावी आणि निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करावे. त्यासाठी असे आदेश शिक्षण विभागाला द्यावेत, अशी विनंतीही गाणार यांनी आपल्या पत्रातून मुख्यमंत्र्यांना केली आहे.