अंटार्क्टिकातील हिमकड्यांच्या आतमध्ये असलेल्या गरम गुहांमध्ये सजीव प्राण्यांची व वनस्पतींचे अनोखे जग वसलेले आहे, असे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या संशोधनातून समोर आलेले आहे. ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी (एएनयू) या विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हे काम केले. अंटार्क्टिकातील रॉस बेटावर असलेल्या माऊंट इरेबस या सक्रिय ज्वालामुखीच्या आजूबाजूच्या प्रदेशात झरे वाहतात. त्या झर्यांच्या प्रवाहामुळे मोठमोठ्या गुहांचे जाळे वसले आहे, असे या संशोधनात दिसून आले आहे.
या गुहांमध्ये मिळालेल्या मातीच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. तेव्हा त्यात शेवाळ, मॉस आणि छोट्या जीवांचे अंश आढळले, असे या शास्त्रज्ञांनी सांगितले. पोलर बायोलॉजी जर्नल नावाच्या नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित झाले आहे. एएनयू फेनर स्कूल ऑफ एन्व्हायरमेंट अँड सोसायटीचे तज्ज्ञ सी फ्रासर म्हणाले, ‘या गुहा आतून अत्यंत गरम असू शकतात. काही गुहांमधील तापमान 25 डिग्री सेल्सिअसएवढे जास्त असू शकते. तुम्ही तिथे टी शर्ट घालूनही सहज राहू शकता.’ अंटार्क्टिकाच्या बर्फाच्या आत काय दडलेले आहे, याची एक झलक या संशोधनातून मिळते. तेथे वनस्पती आणि जीवांच्या नवीन जातीही असू शकतात. या गुहा अधिक जवळून पाहणे आणि जिवंत प्राण्याचा शोध घेणे, हे यापुढील पाऊल असेल. ते मिळाले, तर एका नव्या जगाचा शोध लागेल, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.