चोरीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पोलिस ठाण्यातच स्वीकारली दहा हजारांची लाच
नंदुरबार- चोरीच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी रुग्णवाहिका चालकाकडून दहा हजारांची लाच मागणार्या सटाणा (जि.नाशिक) पोलिस ठाण्याती लाचखोर पोलिस नाईकास नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवार, 14 रोजी सायंकाळी पोलिस ठाण्यातच अटक केली. केशव सुदाम सूर्यवंशी असे लाचखोर पोलिसाचे नाव आहे.
गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी मागितली लाच
सटाणा पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात तक्रारदाराचे मित्र सुनील सुरेश गावीत यांना अटक केली होती व याच गुन्ह्यात रुग्णवाहिकेवर चालक असलेल्या तक्रारदाराला अटक करण्याची धमकी देत कारवाई टाळण्यासाठी दहा हजारांची मागणी शुक्रवारी आरोपी पोलिस नाईक केशव सूर्यवंशी यांनी केली होती. नंदुरबार एसीबीकडे तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिस उपअधीक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संगीता पाटील व सहकार्यांनी सापळा रचला. शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या पोलिस ठाण्यातच आरोपीला तक्रारदाराकडून लाच घेताना पोलिस ठाण्यातच रंगेहाथ पकडण्यात आले. रात्री एक पथक आरोपीच्या मालेगाव येथील घराची झडती घेण्यासाठी रवाना झाल्याचे पोलिस उपअधीक्षक जाधव यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.