सणसवाडी । एक गाव एक शिवजयंती या कार्यक्रमांतर्गत तिथीनुसार येणारा शिवजयंती सोहळा रविवारी मोठ्या उत्सहात सणसवाडीत पार पडला. भगवे पोशाख परिधान करून तरुण, वृद्ध, मुले मोठ्या प्रमाणात यात सहभागी झाले होते. सिहंगडावरून पहाटे शिवज्योत आणण्यात आली होती. चंदनगर येथील बायपासपासून भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत हजारो युवक सहभागी झाले होते. वाघोली, लोणीकंद, कोरेगाव भीमा येथे या रॅलीचे स्वागत करण्यात आले. सायंकाळी 6 वाजता गणेश मोरे, राजेंद्र गलांडे, गणेश वरोळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
शिवरायांच्या राजकीय, न्याय व्यवस्थेवर व्याख्यान
सणसवाडी ग्रामपंचायतीपासून मिरवणुकीला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज व भारतमाता हीजय या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. ग्रामदैवत भैरववनाथ महाराज मंदिराजवळ मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणुकीत शिवज्योतीचे ठिकठिकाणी पूजन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास नागरिकांनी पुष्प वाहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश परिधान करून अश्वावर बसलेले सागर हरगुडे व बालशिवाजीच्या वेशातील ओम हरगुडे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. रात्री शिव व्याख्येते रोहित जगदाळे यांचे व्याख्यान झाले. छत्रपती शिवराय यांच्या राजकीय, सामाजिक व न्याय व्यवस्थेची माहिती त्यांनी यावेळी दिली.