2 जण जखमी; कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दोनदा पलटी होऊन अपघात
पुणे : पुणे-नगर महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास सणसवाडीमध्ये झायलो कारचा अपघात झाला आहे. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे प्रथमदर्शी नागरिकांनी सांगितले आहे. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत.
विजय सुभाष शिवले (40) किशोर बाळासाहेब गोडसे (25 दोघेही रा. मरकळ) अशी अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. पुण्याच्या दिशेने मंगळवारी पहाटेच्या सुमारास झायलो कार जात होती. या कारमध्ये 4 जण प्रवास करत होते. दरम्यान, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दोनदा पलटी होऊन अपघात झाला. यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिकांच्या आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पुणे-नगर महामार्ग हा अपघातांचा सापळाच बनत चालला आहे. या महामार्गाचे चौपद्रीकरण झाले. मात्र, सणसवाडी, शिक्रापूर, रांजणगाव या भागात वाढणार्या उद्योगनगरीचा विस्तार, वाढते शहरीकरण यामुळे वाहतूककोंडी ही नित्याचीच झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या महामार्गावर अपघातांची संख्या वाढत चालली आहे, ही चिंतेची बाब आहे.