सणसवाडी । सणसवाडी, पिंपळे जगताप व वढू बुद्रुक शिवेवरील तीन किलोमीटर परिसर असलेल्या डोंगर रांगांना शुक्रवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आग लागली. यात डोंगर परिसराच्या बाजूस असलेल्या शेतकर्यांच्या बांधावरील झाडे तसेच दोन एकर ऊस व एक कांद्याची आरण जळून खाक झाली. पिंपळे जगताप येथील भारत गॅस कंपनीच्या मागील डोंगर असलेल्या भागास दुपारी आग लागली. कंपनीतील सुरक्षा विभागाने आग आटोक्यात आणली. परंतु पुढे सणसवाडी हद्दीतील डोंगाराने आग पकडली. वार्यामुळे आग झपाट्याने पसरली.
रांजणगाव एमआयडीसीमधील अग्निशामक दलाच्या गाडीने ही आग आटोक्यात आणली. आग आटोक्यात आणत असताना आग डोंगराच्या दिशेने शेताकडे पसरली. त्यामुळे परशुराम नाना दरेकर यांचा एक एकर ऊस तर हनुमंत सोपान दरेकर यांचा 100 गोणी भरेल एवढा कांदा जाळून खाक झाला. यावेळी वन विभागाचे वनरक्षक सोनल राठोड व सहाय्य्क आनंदा हरगुडे यांनी नागरिकांना मदतीस बोलावून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मोहन दरेकर, हनुमंत दरेकर, हिरामण दरेकर, सौरभ दरेकर, विजय दरेकर, हिरामण दरेकर, विजय दरेकर व गणेश दरेकर यांनी आग विझविण्यासाठी सहकार्य केले. याबाबत वन विभागाशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही. जाळ पट्टे न काढल्याने आग वाढत गेली असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. तसेच डोंगर भागालगत लोक वस्ती वाढत असल्याने भविष्य काळात योग्य उपाय योजना वन विभागाने कराव्यात, असे मोहन दरेकर यांनी सांगितले. बाधित शेतकर्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.