महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची रावेरमध्ये मागणी ; प्रशासनाला निवेदन
रावेर- दिवाळीत गरीब कुटुंबांना साखर, तूरदाळ, चणादाळ, पामतेल रेशन दुकानांवर उपलब्ध करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तहसील प्रशासनाला निवेदनाद्वारे करण्यात आली. रावेर तालुक्यात दुष्काळसदृष्य परीस्थिती असून त्यात दिवाळी तोंडावर आल्याने रोजगार उपलब्ध नाही, हाताची कामेदेखील बंद आहे. त्यामुळे शासनाने रेशन दुकानांद्वारे गरीब कुटुंबांना साखर, तूरदाळ, हरभरा दाळ, तेल उपलब्ध करण्याची मागणी नायब तहसीलदार कविता देशमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. गत पाच महिन्यांपासून बंद असलेले गरीबांच्या हक्काचे रॉकेल काळ्याबाजार तर जात नाही ना? याची सुध्दा चौकशी करण्याची मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे. पुरवठा विभागाने यावर गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष संदीपसिंह राजपूत, विकास राऊत, स्वप्नील जावळे, मोहन महाजन, राजेश जैस्वाल, कौशल शिंदे, शुभम मराठे, कपिल गायकवाड आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.