धुळे। धुळे शहर हे कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील असले तरी मानवी मनातील संवेदनशील गुणाचा प्रत्यय देणारे आहे. याचा अर्थ येथील नागरिक प्रेमळ, शांतताप्रिय, सहृदयी आहेत. आगामी सण-उत्सवांच्या काळात धुळ्यात शांतता अबाधीत राखून प्रेम, भाईचारा अधिकाधिक वृध्दींगत व्हावा, यासाठी धुळेकरांनी आपल्या मनातील संवेदनशील गुणांचा प्रत्यय द्यावा, असे आवाहन शांतता कमेटीच्या बैठकीत पोलीस उपविभागीय अधिकारी हिंमत जाधव यांनी केले. मनोगताचा शेवट करतांना त्यांनी ’…कोई देखे न देखे बुराईया अपनी, खुदा तो देख रहा है जरा संभल कर चलो’ अशा शायरीतून नागरिकांमध्ये जनजागृती केली. तसेच यावेळी एसपी एम.रामकुमार यांनीही काही गझल व शायरीच्या माध्यमातून धुळेकरांच्या जुन्या जखमांवर फुंकर घालून त्यांच्यात भाईचारा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
पोलिस प्रशासनासोबत संवाद साधल्यास जिल्ह्यात सुव्यवस्था भक्कम
आज सकाळी पोलीस दलातर्फे चिंतन हॉलमध्ये धुळे शहर व ग्रामीण भागातील शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रामकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, डीवायएसी हिंमत जाधव, साक्रीचे डिवायएसपी निलेश सोनवणे, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ धुळे, शिरपूरचे डिवायएसपी एन.एल. तडवी, शहरचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पीआय रमेशसिंह परदेशी, पीआय अनिल वडनेरे, आझाद नगरचे पीआय दत्ता पवार, देवपूरचे पीआय किशोर शिरसाठ, तालुका पोलीस ठाण्याचे पीआय दिवाणसिंग वसावे, पीआय रत्नपारखी, वाहतूक शाखेचे पीआय मुंडे, दोंडाईचा पोलीस ठाण्याचे एपीआय हेमंत पाटील, देवपूर पश्चिमचे एपीआय अभिषेक पाटील, मोहाडीचे एपीआय जयंत शिरसाठ, एपीआय तोरडमल, सोनगीरचे एपीआय ज्ञानेश्वर वारे, निजामपूरचे एपीआय अर्जुन पटले आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच बाबा धिरजसिंग, रॉड्रीक्स विल्सन, गजाजन पाठक गुरुजी, शकील मोमीन, सोमनाथ गुरव आदींसह सर्व धर्माचे गुरु, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस मित्र आदी उपस्थित होते. कोणाच्या मनात काही प्रश्न असतील, कोणाच्या मनात काही खदखद असेल. त्यांनी खुल्या मनाने आपल्या सर्व समस्या आम्हाला सांगाव्यात. या माध्यमातून प्रशासन लोकाभिमुख व्हावे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न किंवा अन्य काही समस्या उद्भवली तर तुम्ही जिल्हा व पोलीस प्रशासनासोबत संवाद साधावा. तरच कायदा व सुव्यवस्थेची ही इमारत जिल्ह्यासह शहरात भक्कमपणे उभी राहण्यास मदत होईल. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली आहे.