भुसावळ– आवाजाचे बंधन पाळले जात नसल्याने पोलीस प्रशासन डीजेला परवानगी देत नाही, आगामी सार्वजनिक उत्सवात पारंपरिक वाद्याचा वापर करावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी डीजे चालकासह शांतता समितीची बैठकीत उपस्थित युवकांना केले. बाजारपेठ पोलीस ठाण्यांतर्गत बुधवारी दुपारी व सायंकाळी बैठकीचे आयोजन करण्यात आले. नीलोत्पल म्हणाले की, कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कटू कारवाई करणे आम्हाला भाग आहे. नागरीकांनी आगामी सण-उत्सव शांततेत साजरे करावे व कुणालाही आपल्यापासून त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी.
छत्रपतींना वाचून समजण्याची गरज
छत्रपती शिवरायांना समजून घेण्यासाठी नाचण्याची गरज नाही तर वाचून समजून घेण्याची गरज असल्याची भावना उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी बोलून दाखवली. ते म्हणाले की, उत्सवाचे पावित्र्य राखणे अत्यंत गरजेचे आहे. नियोजित पुतळ्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. डीजे बंदीचे शासन आदेशच आहेत.
यांची होती उपस्थिती
डीजे चालकांच्या बैठकीस बाजारपेठ निरीक्षक चंद्रकांत सरोदे, सहाय्यक निरीक्षक मनोज पवार उपस्थित होते. सायंकाळी शांतता समितीच्या बैठकीला उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर, मुकेश गुंजाळ राजू सूर्यवंशी, प्रदीप देशमुख, ताहेरखान पठाण, बाजारपेठ निरीक्षक चंद्रकांत सरोदे, सहाय्यक निरीक्षक मनोज पवार यांची उपस्थिती होती.