सततचा तणाव कॅन्सरकडे नेणारा

0

चोपडा । मानवी जीवनात मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढली आहे. मानव बदलती जीवनशैलीला अवास्तव व अधिक महत्त्व देत आहे. धकाधकीच्या जीवनात अनेकदा तणाव येत असतो. सततच्या कामकाजामुळे काही वेळा आरोग्याकडे दुर्लक्ष करणे तसेच सततचा तणाव हा कॅन्सरकडे नेणारा असल्याचे पुणे येथील आस्था ब्रेस्ट कॅन्सर गृपचे डॉ.शेखर कुलकर्णी यांनी सांगितले. चोपड्यातील नगर पालिका नाट्यगृहात हरताळकर हॉस्पिटलतर्फे आस्था गृप पुणे तर्फे निर्मित ’हीलिंग हार्मनी’ या संगीत आणि आरोग्य यांचा समन्वय साधणारा आगळा-वेगळा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. मराठी, हिंदी चित्रपटातील अनेक गाजलेली गाणी, विविध रागदरीवरील सुमधुर गाणी यावेळी सादर करत कॅन्सरविषयी प्रबोधन करण्यात आले.

कॅन्सर टाळण्यासाठी पाळावयाच्या ’अतिभयंकर सूचना’ याविषयी सखोल सोदाहरण माहिती दिली. तरुण मुलीमध्ये स्तनांच्या कॅन्सरचे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले. यावेळी कॅन्सरतज्ञ डॉ.संजोग जैस्वाल यांनीही मार्गदर्शन केले. त्यांच्या समवेत ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट गृपच्या प्रतिभा कर्णिक, माधवी फडणीस व नंदा पाठक यांनी कॅन्सरग्रस्त महिलांनी कॅन्सरला न भीता कॅन्सरला कसे सामोरे जावे आणि घ्यावयाची काळजी याविषयी आवश्यक टिप्स दिल्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी हरताळकर हॉस्पिटलचे डॉ.विकास हरताळकर, डॉ.शेखर कुलकर्णी, प्रतिभा कर्णिक, माधवी फडणीस व नंदा पाठक यांनी दीपप्रज्वलन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.नीता हरताळकर यांनी केले. सूत्रसंचालन राधेश्याम पाटील यांनी तर आभार डॉ.अमित हरताळकर यांनी मानले. कार्यक्रमास माजी आमदार डॉ.सुरेश पाटील, कैलास पाटील, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, उपनगराध्यक्ष हितेंद्र देशमुख, जीवन चौधरी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अँड संदिप पाटील, डॉ.स्मिता पाटील, डॉ.विजय पोतदार, आशिष गुजराथी, सुधाकर केंगे, संजीव बाविस्कर, डॉ.प्रेमचंद महाजन, अँड.घनश्याम पाटील यांच्यासह तालुकातील डॉक्टर्स, प्राध्यापक, शिक्षक व अनेक मान्यवर उपस्थित होते.