फुगा लघुपटाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण ; ‘नवरा भवरा’ हा व्यंग हास्य काव्य संग्रहाचेही प्रकाशन
फैजपूर- स्वच्छतेचा संदेश घराघरात पोहोचविण्यासाठी येथील सतपंथ कला केंद्राने ’फुगा’ या लघूपटाची निर्मिती करून फैजपूर शहराच्या नावलौकिकात भर घालण्यात आली आहे. सतपंथ कला केंद्राने घडविलेला विद्यार्थी आज शिक्षक म्हणून काम करीत असल्याने कलेसोबत रोजगारही मिळत असल्याने याचा सार्थ अभिमान असल्याचे फैजपूर विभागाचे प्रांत डॉ.अजित थोरबोले यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले. सतपंथ मंदिर संस्थानच्या धर्मशाळेत आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात स्वच्छतेवर आधारीत ’फुगा’ या लघुपटाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
व्यासपीठावर यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर सतपंथ कला केंद्राचे प्रमुख महंत महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, स्वामीनारायण गुरुकुलचे उपाध्यक्ष शास्त्री भक्तीकिशोरदासजी महाराज, मुख्यधिकारी किशोर चव्हाण, तापी परिसर विद्या मंडळाचे चेअरमन लीलाधर चौधरी तसेच गुरुकुलचे व्यवस्थापक पी.डी.पाटील उपस्थित होते.
ग्रामस्वच्छतेचा संदेश देणारा लघूपट -जनार्दन महाराज
महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी याप्रसंगी पत्रकार, कथाकार आणि कलाकार या तिघांचा सतपंथ कला केंद्राशी स्नेहाचा संबंध असल्याने या कला केंद्राने आजपर्यंत संगीत कला क्षेत्रात अनेक विद्यार्थी घडविले. नदी, गाय, आंबा आदी स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी देत राहतात. निसर्ग आपल्याला सर्व काही देतो त्या बदल्यात अपेक्षा नसते तोच भाव आपण बाळगला पाहिजे. कोणत्याही स्वार्थाशिवाय केलेला ग्रामस्वच्छतेचा संदेश देणारा हा लघुपट आहे. या कला केंद्रांतर्गत समाज प्रबोधनावर आधारीत तीन लघुपटांची निर्मिती केलेली आहे. जाती व्यवस्थेवर आधारित ‘जोखड’, बाल लैंगिक शोषण शोषणावर आधारित ‘गर्ता’, कचरा उचलताना नकळत ग्राम स्वच्छतेचे काम करणार्या लोकांवर आधारीत ‘इन व्हिजीबल हिरोज’ या डॉक्युमेंटरीची निर्मिती केलेली आहे. या नववर्षात सतपंथ कला केंद्र आणि संगीत व नाट्यविभाग धनाजी नाना महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्र. उत्पल चौधरी दिग्दर्शित ग्रामस्वच्छता अभियानावर आधारित लेवा गणबोलीतील पहिल्या लघुपटाचे अनावरण दिनांक 1 जानेवारी 2019 या शुभ दिवशी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. लघुपटाची कथा व पटकथा उत्पल-हरीश यांची असून पार्श्व संगीत उत्पल-रवी यांचे आहे.
लघूपटात स्थानिक कलाकारांना संधी
विशेष म्हणजे हा लघुपट स्थानिक कलाकारांना घेऊन करण्यात आला आहे. फुगा हे एक सामाजिक विडंबन असून आजच्या युगात माणसाची प्रवृत्ती ही स्वार्थीपणाची झालेली आहे. कोणतेही सामाजिक कार्य स्वार्थाविना करण्याचा कोणाचाही दृष्टिकोण नाही. हे या लघुपटाद्वारे प्रेक्षकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केंद्राच्या कलाकारांनी केलेला आहे. हा लघुपट युट्युब वर ‘स्वरगंधा फिल्म’ या चॅनेलवर उपलब्ध असल्याचे प्रास्ताविकेत दिग्दर्शक प्रा. उत्पल चौधरी यांनी सांगितले. यावेळी फैजपूरसह परीसरातील मान्यवर मंडळी या कार्यक्रमास उपस्थित होती. मान्यवरांच्या हस्ते ‘फुगा’ या लघुपटातील कलाकारांचा शाल-बुके देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन प्रीती चौधरी यांनी केले. दरम्यान, खिरोदा येथील कवी वसंत इंगळे लिखीत खानदेशी तडका ‘नवरा भवरा’ हा व्यंग हास्य काव्य संग्रह मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.