रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला मुस्लिम धर्मात फार महत्त्वाचे स्थान आहे. रमजान हा महिना अतिशय हर्ष उल्हासाच्या वातावरणात भारतासह संपूर्ण जगात साजरा केला जातो. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद स.अ. यांचा सर्वात प्रिय महिना म्हणुन रमजान महिना ओळखला जातो. या महिन्याची सुरूवात चंद्र दर्शनाने होते. चंद्र दर्शन ज्या दिवशी होते. त्याच्या दुसर्या दिवसापासुन मुस्लिम बांधव रोजा (उपवास) करतात. या महिन्याच्या पहिल्या रात्री पासुन शैतानांना (दुष्ट शक्तींना) कैद केले जाऊन जहन्नम (नरक) चे दार बंद केले जाते. आणि त्यानंतर घोषित केले जाते की, ज्या लोकांना पुण्य हवे आहे, त्यांनी पुढे व्हावे. आणि जे लोक वाईट कृत्य करणारी आहेत, त्यांनी त्यापासून लांब थांबावे. अशा प्रकारे अल्लाहच्या कृपेमुळे अनेक लोकांची जहन्नम अर्थात नरकापासुन सुटका होते. असे चक्र पुर्ण महिनाभर सुरू असते. या महिन्यात पुढील बाबींचे खास लक्ष ठेवावे लागते. यात प्रामुख्याने 1. रोजा, 2. नमाज, तरावीहची विशेष नमाज, 3. शब-ए-कद्र (विशेष प्रार्थनेची पवित्र रात्र), 4. कुराण पठण, 5. जकात आणि 6. फितरा(दानधर्म)
1. रोजा (उपवास) – रोजा म्हणजे पहाटे सूर्योदयाच्या अगोदरच न्याहरी करून संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळी फलोहार सह जेवण केले जाते. मध्यंतरीच्या काळात अन्न – पाण्याचे एक कण सुध्दा खाणे-पिणे व्यर्ज असते. असे पूर्ण महिनाभर 29 वा 30 दिवस चालते. रोजा या मागेही शास्त्रीय कारण आहे. वैज्ञानिक दृष्टीने आपल्या शरीराच्या चयापचय संस्थेला आराम मिळावा व आपले शरीर रूपी मशीन सर्व्हिसिंग होऊन आणखीन जोमाने कार्य करावे म्हणुन रोजा केला जातो. रोजा सब्र (संयम), शुक्र (धन्यभाव), तकवा (ईशभिरुता) यांचीही शिकवण रोजेधारकांना देत असतो. रोजा हा गर्भवती महिला, मोठा आजार असलेली व्यक्ती (उदा. कॅन्सर, हार्ट पेशन्ट), रोजा ठेवल्याने ज्यांचा जीवन-मरणाचा प्रश्न उदभवु शकतो. असे व्यक्ती, प्रवासी तसेच कमीत कमी सात ते अकरा वर्षे वयाच्या आतील लहान बालके यांच्यावर रोजा माफ करण्यात आला आहे.
2. नमाज, तरावीहची विशेष नमाज – मुस्लिम धर्मात पाच वेळा नमाज फर्ज (अनिवार्य) करण्यात आलेली आहे. पहाटे फजरची नमाज, दुपारी जोहरची नमाज, सुर्यास्ताच्या अगोदरची असरची नमाज, सायंकाळी मगरीबची नमाज, आणि रात्री इशाची नमाज असे एकुण पाच नमाज फर्ज (अनिवार्य) आहेत. नमाज हाही एकप्रकारे शास्त्रीय व्यायामाचा प्रकारच म्हणावा लागेल. नमाजसाठी साद आणि नमाज ची वेळ कळण्यासाठी विविध मशिदींत कर्णावरून अजान (आवाहन) दिली जाते. ज्यामुळे मुस्लिम बांधव नमाजसाठी मशिदीं कडे धाव घेतात. कर्णावरून उच्चारण्यात येणारे शब्द अल्लाहू अकबर याचा अर्थ होतो की, तो सर्व श्रेष्ठ अल्लाह आहे. आणि त्याच्या नमाजची,प्रार्थनेची वेळ झालेली आहे. मशिदींत येऊन नमाज अदा करा. गोरा असो वा काळा, राजा असो वा रंक, सर्वजण अल्लाहच्या घरात म्हणजेच मशिदींत आपापसातले भेदभाव विसरून एका रांगेत (जमात) नमाज साठी उभे असतात. ’एकही सफ में खड़े हो गए, मेहमूदो-अयाज, ना कोई रहा, ना बंदा नवाज’ ही अवस्था असते.
3. शब-ए-कद्र (विशेष प्रार्थनेची पवित्र रात्र)-रमजानची 27 वी शब (रात्र) सर्वात पवित्र मानली गेलेली आहे. याच पवित्र रात्री अल्लाह कडून ईशवाणी कुराणाचे अवतरण झाले असल्यामुळे या रात्री विशेष ईबादत (आराधना) केली जाते.म्हणून काही लोकं हिला जागण्याची रात्र सुद्धा म्हणतात. या रात्री फरिश्ते (देवदुत) व जिब्राईल-ए-अमीन (अल्लाहचे संदेश वाहक) यांचे सह इतर फरिश्ते जमिनीवर उतरतात व या पवित्र रात्री जो कोणी प्रार्थना करीतो, कुराण, नमाज चे पठण करतो,अल्लाहच्या इबादत मध्ये मग्न असतो. त्या सर्वांना फरिश्ते सलाम करून त्याच्या भल्यासाठी दुआ करतात.
4. कुराण – इस्लाम धर्माचा सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ, प्रेषित हजरत मोहम्मद स.अ. यांच्या वर अल्लाहकडुन अवतरीत झालेला आसमानी संदेश, कुराण हा धर्मग्रंथ होय. जो विश्वातील समस्त मानव जातीला उद्देशून आहे. रमजान महिन्याच्या शब-ए-कद्र या पवित्र रात्री कुराण नाजील (अवतरित) झाला आहे. या पवित्र धर्मग्रंथात तीस पारे (अध्याय), एकशे चौदा सुराह, व चौदा सजदे आहेत. याला सजदा-ए-तिलावत म्हणतात. आणि जो या पवित्र रात्री, या पवित्र रमजान महिन्यात कुराण पठन करेल, याचे त्याला पुण्य मिळेल. कुराण हा पवित्र ग्रंथ असुन तो कयामत (अंतिम निवाड्याचा दिवस) पर्यंत कायम राहणार आहे. पृथ्वीच्या अंतापर्यंत सर्व लोकांना हिदायत नामा (शिकवण) आहे. या पवित्र ग्रंथाची जबाबदारी अल्लाह ने स्वतः स्विकारलेली आहे. व याच प्रमुख कारणामुळे आज चौदाशे – साडे चौदाशे वर्ष लोटली तरी या पवित्र ग्रंथाच्या ज़ेर-ज़बर (काना-मात्रात) कोणताही बदल झालेला नाही. आणि ईन्शा अल्लाह अजवजल (अल्लाहच्या कृपेमुळे) कयामतपर्यंत होणारही नाही.
5. जकात आणि 6. फितरा (दानधर्म) – हा या महिन्याचा फार महत्वाचा भाग आहे. जकात म्हणजे गेलेल्या वर्षाच्या फायद्यातुन खर्च,कर्ज, देणी वजा जाता राहिलेल्या नफ्यातील रक्कमेतुन 100 रूपयास अडीच रूपये जकात व फितरा म्हणजे घरातील एका माणसावर अडीच किलो गहु किंवा त्या इतकी किंमत अशा स्वरूपात प्रथम गरीब नातेवाईकाला, गोर-गरीब,अनाथ,विधवा,फकीर यांना जकात व फितरा दान स्वरूपात दिले जाते.गरीब,वंचित घटकांनाही ईदच्या खुशीमध्ये सामील करून घेतले जाते.
वरील सर्व बाबींवरून असे लक्षात येते की, रोजा म्हणजे केवळ खाने-पिणे सोडणे,उपाशी-तहानलेले राहणे, एवढेच नाही तर रोजा, नमाज, तरावीह ची विशेष नमाज, शब-ए-कद्र (विशेष प्रार्थनेची पवित्र रात्र), कुराण, जकात आणि फितरा या सर्वांचा योग्य असा ताळमेळ आहे. जो हे सर्व कर्म योग्यरित्या मनोभावे पुर्ण महिनाभर पार पाडतो. त्याला अल्लाह अशा प्रकारे पुण्य देईल की, तो आत्ताच आपल्या आईच्या पोटातुन जन्म घेवुन आला आहे. (म्हणजेच जन्मापासुन ते आतापर्यंतचे सर्व गुन्हे माफ होतील). महिनाभराच्या उपवासानंतर चंद्रदर्शन होते. त्याच्या दुसर्या दिवशी सकाळी मुस्लिम बांधव यात पुरूष, महिला, लहान-मोठे सर्वच जण सुवासिक तेल (इत्र) लाऊन, नवीन कपडे परिधान करून ईदच्या विशेष नमाजसाठी ईदगाह मैदान, मशिदींमध्ये जातात. या विशेष नमाजला ईद-ऊल-फितरची नमाज असे म्हणतात. स्त्रिया घरातच नमाज पठण करतात. नमाजनंतर सर्व एकमेकांना आलिंगन (गळाभेट) देतात. त्यानंतर घरोघरी भेटायला जाऊन शिरखुरम्याचा (दूध-सुका मेवांचा गोड पदार्थ) आस्वाद घेतला जातो. ईदच्या दिवशी विशेषतः लहान मुलांची मज्जाच मज्जा असते. मोठ्यांकडुन भेट म्हणुन लहान मुलांना पैसे, मिठाई, चॉकलेट दिले जाते. अशा पद्धतीने संपूर्ण रमजान महिना प्रेम, शांती, आनंद व बंधुभावाने साजरा होत असतो.
– अशफाक पिंजारी, जळगाव
मो. नं. 9823378611.