सत्ताधारीच विरोधकाच्या भूमिकेत

0

अधिवेशनाचा तिसरा दिवसही आंदोलनाने गाजला. विरोधी पक्षांची आंदोलन नित्याचीच असतात, पण वाढीव पाणी मिळावे यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदारही आक्रमक झाल्याचे दिसून आले. विधानभवनाच्या पायरीवर ठिय्या मारून विरोधकांप्रमाणे जोरदार घोषणाबाजी केली. आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो असे शिवसेनेचे मंत्री सांगत होते. कदाचित, शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनामे तर दिले नाहीत ना, अशीच शंका काही वेळ आंदोलन पाहून अनेकांच्या मनात उपस्थित झाली. विशेष म्हणजे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे त्याच ठिकाणी हजर होते. त्यामुळे जणू काही शिंदेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे की काय, असाच भ्रम अनेकांचा झाला. काही वेळानंतर विधानभवनातून अजित पवार हे बाहेर पडले. त्याचवेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात विधानभवनाबाहेर गुप्तगु चर्चा झाली. दहा ते पंधरा मिनिटांच्या चर्चेनंतर अजित पवार निघून गेले. पुन्हा शिंदे हे आंदोलक आमदारांजवळ जाऊन उभे राहिले. सत्ताधारी आमदारांनाच आंदोलन करावे लागत असल्याने विधानभवन परिसरात हा चर्चेचा विषय ठरला होता. सत्ताधारी विरोधकांच्या भूमिकेत पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.

परिचारक यांच्या मुद्यावरून विधान परिषदेचे आणि शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून विधानसभेत विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब झाले. शेतकर्‍यांची कर्जमाफी हा विरोधकांच्या अजेंड्यावरचा प्रमुख विषय असतानाही या विषयाला विरोधकांनी अधिवेशनाच्या तिसर्‍या दिवशी हात घातला. विशेष म्हणजे बुधवारी मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होती. सहाजिकच शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या नजरा त्या निवडणुकीकडे लागल्या होत्या. दोन्ही सभागृह तहकूब झाल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांना आणि आमदारांना आयतीच संधी मिळाली. त्यामुळे सभा तहकुबीनंतर सगळेच जण मुंबई महापालिकेच्या दिशेने रवाना झाले. मंत्र्यांना आणि आमदारांना भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची विधानभवनाच्या गेटबाहेर गर्दी झाली होती. पासेस बनवण्यासाठी आमदारांच्या पीएला संपर्क केला जात होता. गाव खेड्याहून अनेक कार्यकर्ते आले होते. या कार्यकर्त्यांना कार्यालयातच जेवणाची ताटे मागवण्यात आली. बुधवार असल्याने जेवणात नॉनव्हेजचा मेनू होता. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नॉनव्हेजवर यथेच्छ ताव मारला.

– संतोष गायकवाड
9821671737