आमदार संजय सावकारे यांची विरोधकांवर घणाघाती टिका
भुसावळ- भुसावळ पालिकेतील सभा रद्द करण्याची मागणी करणार्या व सत्ताधार्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणार्या विरोधकांचेच हात भ्रष्टाचाराने बरबटलेले असल्याने सभा उधळण्याचा कुटील डाव गेल्या दिड वर्षांपासून सुरू असल्याची टिका आमदार संजय सावकारे यांनी येथे केली. शुक्रवारी जनआधार विकास पार्टीने सत्ताधार्यांच्या विरोधात उपोषण छेडल्यानंतर आरोपांचे खंडन करण्यासाठी शनिवारी सायंकाळी भाजपच्या पदाधिकार्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परीषदेचे आयोजन केले होते. याप्रसंगी आमदार बोलत होते.
विरोधकांची घाण आम्ही करतोय साफ- सावकारे
आमदार सावकारे पुढे म्हणाले की, गेल्या 15 वर्षांपासून विरोधकांनी शहरात केलेली घाण आमचे नगरसेवक साफ करीत आहे. एकीकडे शहराचा विकास सुरू असतांना दुसरीकडे कचरापेट्यांना आग लावणे, हायमास्ट दिव्यांचे स्वीच फोडणे, शौचालयाची तोडफोड करणे असे उपद्व्याप विरोधकांकडून सुरू आहे. कचरा ही दररोज निघणारी बाब असून सकाळी सोशल मीडियावर त्याचे फोटो व्हायरल करून शहर अस्वच्छ असल्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधक करीत आहे. दिड वर्षांच्या काळात भाजपच्या सत्ताधार्यांनी अस्वच्छतेचा डाग पुसून मिळवलेले पारीतोषिक म्हणजे ही त्या कामाची पावती होय, असे सावकारे म्हणाले.
आम्ही त्यांचे चेले व त्यांच्यातलेही आमचे चेले
भुसावळ पालिकेत दोन मिनिटात सभा गुंडाळण्याचा प्रघात विरोधकांच्या काळापासूनच सुरू असून त्याची पुनरावृत्ती होत असल्याची कबुली आमदारांनी अप्रत्यक्ष पत्रकार परीषदेत दिली. ‘आम्ही त्यांचे चेले, व त्यांच्यातलेही आमचे काही चेले’ असा काहीसा प्रकार असल्याचे ते म्हणाले. नागरीकांनी शहर आपले समजून स्वच्छता बाळगावी, असे आवाहन करीत नालेसफाई उत्तम दर्जाची व्हावी, अशी सुचना त्यांनी प्रसंगी नगराध्यक्षांना केली.
विरोधकांचे हात भ्रष्टाचारात बरबटलेले
आमदार संजय सावकारे म्हणाले की, विरोधकांच्या काळात घनकचरा व्यवस्थापनात भ्रष्टाचार झाला व याबाबत आपण लोकलेखा समितीकडे तक्रार केल्यानंतर चौकशी सुरू करण्यात आली. न्यायालयाचे निर्णय तसेच सुरू असलेल्या चौकशांसंदर्भात पालिकेच्या बैठकीत विषय मांडले जातात मात्र विरोधकांचे भ्रष्टाचारात हात बरबटलेले असल्याने ते सभा उधळण्याचा कुटील डाव रचत असल्याचा आरोप आमदारांनी केला. पालिकेची सभा सर्व विषयांचे वाचन करून सुरू ठेवण्याची सुचना आपण नगराध्यक्षांना केल्याचे त्यांनी सांगितले.
अमृत योजनेच्या श्रेयवादानंतर टीकेचा भडीमार
भुसावळात सुरू असलेल्या अमृत योजनेचे काम आमच्याच काळात मंजूर झाले, असा दावा करणार्या विरोधकांनी सुरूवातीला कौतुकाने पाठ थोपटली मात्र आता त्याच योजनेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत, असे आमदार म्हणाले. नगरोत्थान योजना त्यांच्याच काळात रद्द झाली, असे सांगत मुद्रा लोनमध्ये यांचेच पंटर अडकल्याचा दावा त्यांनी केला. अण्णाभाऊ साठे महामंडळाची चौकशी यापूर्वीच झाली असून यांनी मात्र निष्पापांच्या नावावर कर्ज काढल्याची टिका सावकारे यांनी केली.
शहर विकास हाच ध्यास- रमण भोळे
आमच्यावर आरोप करणार्यांना दुसरे काम नसून शहर विकासात अडथळे आणणे हा एकच त्यांना उद्योग असून आमचा मात्र शहराचा विकास हाच ध्यास असल्याची माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिली. जनआधार विकास पार्टीचा रीमोट माजी आमदार संतोष चौधरींकडे असून ते जेव्हढे सांगतील तेव्हढेच नगरसेवक करतात, असे सांगत रिकाम्या राजकारणात आम्हाला अडकायचे नाही, असे त्यांनी सांगितले.
पालिका सभेतील एकतरी चुकीचा विषय दाखवा !
पालिकेच्या सभा रद्द करण्याची मागणी करणार्या विरोधकांनी पालिका सभेतील एकतरी चुकीचा विषय दाखवावा वा सत्ताधारी नगरसेवकांचा काही फायदा होत असलेला विषय मॅग्निफाय ग्लासाने शोधून दाखवावा, असे आव्हान नगराध्यक्ष भोळे यांनी विरोधकांना केले. अमृत योजनेचे काम शहरात सुरू असतांना ब्रेक लावण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहे. नियमानुसार योजनेचे काम सुरू असल्याचे नगराध्यक्ष म्हणाले. मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांच्यावरील आरोप निरर्थक असून विरोधकांचा आम्ही निषेध करत असल्याचे भोळे म्हणाले.
** अस्वच्छता हे विरोधकांचे पाप- लोणारी
आधीच्या सत्ताधार्यांनी शहर बकाल केले, अस्वच्छता हे विरोधकांचे पाप असून आता टिका मात्र आमच्यावर केली जात असल्याचे दुर्दैव असल्याचे माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी म्हणाले. भुसावळ पालिकेला बक्षिस मिळाल्यानंतर साधे अभिनंदन सोडा, याबाबत चौकशीची केलेली मागणी म्हणजे हास्यास्पद प्रकार असल्याचे लोणारी म्हणाले.
यांची होती उपस्थिती
पत्रकार परीषदेला उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, भाजपचे सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, गटनेता हाजी मुन्ना तेली, नगरसेवक तथा सी.ए. दिनेश राठी, पिंटू कोठारी, किरण कोलते, मुकेश पाटील, पुरुषोत्तम नारखेडे, मुकेश गुंजाळ, अॅड.बोधराज चौधरी, राजेंद्र आवटे, देवा वाणी, दिनेश नेमाडे, वसंत पाटील, निक्की बतरा, सतीश सपकाळे, किशोर पाटील आदींची उपस्थिती होती.