सत्ताधारी भाजपने स्मार्ट सिटीची बैठक गुंडाळली

0

पुणे । महापालिकेत पालकमंत्री बैठकीसाठी येणार असल्याचे कारण सांगत स्मार्ट सिटीची बैठक सत्ताधारी भाजपने गुंडाळली, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. एवढेच नव्हे, तर स्मार्ट सिटीतील विकास कामे करण्याऐवजी केंद्र, राज्याकडून आलेल्या 400 कोटी रुपयांच्या एफडी करून त्याच्या व्याजावरील कर चुकविण्यासाठी आता पळापळी सुरू झाली आहे, असा आरोपही विरोधकांनी केला आहे.

स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लि.च्या संचालक मंडळाची सोमवारी बैठक बोलावण्यात आली होती. कंपनीचे अध्यक्ष आणि प्रधान सचिव डॉ. नितीन करीर या बैठकीला उपस्थित नसल्याने विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. याला महापौर मुक्ता टिळक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे प्रतिनिधी रवींद्र धंगेकर आदी उपस्थित होते.

महत्त्वाच्या विषयांना बगल
या बैठकीत नमूद करण्यात आलेल्या अजेंड्यातील सुरूवातीच्याच काही विषयांवर चर्चा करण्यात आली. मात्र महापालिकेत पालकमंत्री गिरीश बापट पक्षाची बैठक घेण्यासाठी येणार असल्याचे कारण देत भाजपच्या सदस्यांनी सुरुवातीच्याच काही विषयांवर चर्चा करून तहकुबी मांडली. त्यामुळे अजेंड्यावर शेवटी असलेल्या परंतु महत्त्वाच्या विषयांवर काहीच चर्चा करण्यात आली नाही. त्यामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील जो भाग निवडण्यात आला आहे. त्या भागातून मिळणार्‍या मिळकतकरातील काही भाग स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनला मिळावा, असा प्रस्ताव स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनने ठेवला होता. याशिवाय स्मार्ट सिटीची कोणती कामे आली आहेत, या विषयीचे प्रगतीपुस्तक विरोधी पक्षांनी मागितले होते. याशिवाय बैठकीच्या अजेंड्यावर जेवढे विषय होते, त्यातील महत्त्वाच्या विषयांना सत्ताधार्‍यांनी बगल दिली.

कोट्यवधी रुपयांच्या ठेवी
वास्तविक दोन-तीन महिन्यांतून एकदा ही स्मार्ट सिटीची बैठक होते. असे असताना जो अजेंडा दिला आहे, त्याविषयी तरी चर्चा होणे आवश्यक होते. मात्र त्याविषयी काहीच चर्चा या बैठकीत करण्यात आली नाही. मात्र स्मार्ट सिटीसाठी केंद्राकडून आलेले 200 कोटी रुपये, महापालिकेने दिलेले 100 कोटी रुपये आणि राज्यसरकारकडून आलेले 92 कोटी रुपये कंपनीने विकास कामे करण्याऐवजी थेट बँकेत ठेव म्हणून ठेवले आहेत. एवढेच नव्हे, तर या पैशांवर मिळणार्‍या व्याजावर आयकर भरावा लागू नये, यासाठी कंपनीने क्लृप्त्या शोधायला सुरुवात केली आहे. या सर्व परिस्थितीवर विरोधी पक्षनेते तुपे यांनी टीका केली असून, महत्त्वाच्या प्रश्‍नांना सत्ताधार्‍यांनी बगल देत बैठक गुंडाळल्याची टीका त्यांनी केली.