शहर भाजपमध्ये सुंदोपसुंदी सुरूच
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर भाजपमध्ये सुंदोपसुंदी सुरुच आहे. महापालिकेतील सत्तेची वर्षपूर्ती होत असतानाच भाजपमध्ये महापौरांपासून विषय समित्यांच्या सदस्यांचे राजीनामा नाट्य रंगले होते. आता प्रभाग समिती स्वीकृत सदस्य निवडीवरुन नवे, जुने यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. आयारामांना प्रभाग समितीवर संधी दिल्याचा आरोप करत भाजपच्या निष्ठावंतानी एका दिवसाचे उपोषण केले. मुरब्बी कारभारी असनूही सत्तेच्या एका वर्षात चमकदार कामगिरी करता आली नाही. कारभार्यांची तोंडे परस्परविरोधी आहेत. पक्षांतर्गत मतभेत उफाळून येत आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपमध्ये नेमकं चाललंय तरी काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
कार्यकर्त्यांची विभागणी
महापालिकेतील भाजपच्या अभूतपूर्व सत्तेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षभरात विकास कामांपेक्षा भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आणि पक्षातील मतभेदांमुळेच भाजप अधिक चर्चेत राहिला. वर्षभरात एकही चमकदार, उठावदार काम सत्ताधार्यांना करत आले नाही, ही वस्तुस्थिती आहे. जुने-नवे, आयाराम-गयाराम, भाऊ-दादा आणि निष्ठावान अशी कार्यकर्त्यांची विभागणी झाली आहे. पक्षातील पदाधिकारी एकमेकांकडे संशयाने पाहतात.
कारभारात सुसुत्रता आणणे गरजेचे
आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे आणि खासदार अमर साबळे यांना महापालिकेवर हुकुमत गाजवायची आहे. त्यातून त्यांच्यात शह-काटशहाचे राजकारण सुरु आहे. याचे पडसाद पालिकेच्या कारभारावर पडत आहेत. जून महिन्यात सत्ताधारी पक्षात मोठ्या उलथा-पालथी होणार असल्याची चर्चा आहे. भोसरीत विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही आमदारांकडे पालिकेचा कारभार सुपूर्त केला आहे. त्यामुळे आपसुकच खासदारांच्या पालिकेतील हस्तक्षेपाला लगाम लागला आहे. पालिकेतील कामकाजावर होणार्या आरोपांच्या फैरी आमदार जोडीलाच सहन कराव्या लागणार आहेत. पालिकेतील चांगल्या कामाबद्दलची शाबासकीही त्यांनाच मिळणार आहे. त्यामुळे पक्षार्तंगत बंडाळी व जुन्या-नव्यांचा वाद थोपवून पालिकेच्या कारभारात या दोघांना सुसुत्रता आणणे गरजेचे आहे.