सत्ताधार्‍यांकडून लोकप्रतिनिधींची मुस्कटदाबी

0

अनधिकृत बांधकामाचे वास्तव समोर येणार असल्याने सत्ताधारी घाबरले
महापालिका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा आरोप

पिंपरी-चिंचवड : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका अशा लौकिक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेची दोन-दोन महिने सर्वसाधारण सभा होत नाही. यामुळे विकासकामांना खीळ बसत आहे. मात्र, याचे सत्ताधा-यांना काही सोयरेसुतक नाही. त्यांना फक्त आपण कसे अडचणीत येऊ नये, याचीच भीती वाटत आहे. सभा तहकूब करुन सत्ताधारी लोकप्रतिनिधींची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे.

बेकायदा बांधकामांची संख्या दुप्पट
भाजपने गेल्या सव्वा वर्षात तब्बल 18 वेळा महासभा तहकूब केली आहे. यावरुन विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी सत्ताधार्‍यांवर हल्ला चढविला आहे. पत्रकारांशी बोलताना साने म्हणाले, भाजपच्या राजवटीत शहरातील अनधिकृत बांधकामाची जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी सर्वसाधारण सभेत अनधिकृत बांधकामांविषयी विचारलेल्या प्रश्‍नांमुळे भाजपचा हा चेहरा जनतेसमोर येणार आहे. याशिवाय जागा ताब्यात नसतानादेखील शहरातील पार्कींग धोरण निश्‍चितीसाठी भाजपचा आटापिटा सुरु आहे. हे दोन्ही विषय भाजपच्या अंगलट येणारे आहेत. त्यामुळे वारंवार सभा तहकूब केली जात असून हा त्यावरील उपाय ठरु शकत नाही

सभा तहकुबीमुळे शहराचे नुकसान
कोणत्याही आदरणीय व्यक्तिचे निधन झाल्यास, त्या व्यक्तिला श्रद्धांजली वाहण्यात यावी. याबद्दल कुणाचेच दुमत नाही. मात्र, याकरिता दहा मिनिटे, अर्ध्या तासाची तहकुबी समजु शकतो. भाजप नेते पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर त्यांना सभागृहात श्रद्धांजली अर्पण करुन, अर्ध्या तासाच्या तहकुबीनंतर सभा सुरु करणे अपेक्षित होते. मात्र, ही सभा येत्या 20 तारखेपर्यंत तहकूब केल्याने शहराचे नुकसान होत आहे. या दिवशी तहकूब आणि नियमित अशा दोन सभा होणार आहेत. या दोन्ही सभा एकाच दिवशी होतील का नाही. याबाबत मी साशंक आहे असेही साने म्हणाले.

सर्व बांधकामे राष्ट्रवादी काळातील : पवार
याबाबत बोलताना सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, राष्ट्रवादीच्या काळातच शहरातील अनधिकृत बांधकामे झाली आहेत. भाजपच्या एका वर्षांच्या काळात ही संख्या 66 हजारांहून एक लाख 87 हजारांवर गेली म्हणणे चुकीचे आहे.