सत्ताधार्‍यांसह विरोधकांनी गाजवली मुक्ताईनगर नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा

0

विकासकामे रेंगाळत ठेवणार्‍या मुख्याधिकार्‍यांवर प्रश्‍नांचा भडीमार ; कचरा व्यवस्थापनाचा प्रश्‍नही गाजला

मुक्ताईनगर- नगरपंचायतीची तिसरी सर्वसाधारण सभा मंगळवार, 27 नोव्हेंबर रोजी विविध विषयांवर गाजली. चर्चेत विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकांनीदेखील सहभाग घेत रेंगाळात काम ठेवण्याच्या मुख्याधिकार्‍यांच्या भुमिकेविरुद्ध उघड विरोध घेतल्याचे दिसून आले. ई-टेंडरींगच्या फेर्‍यात फिरणार्‍या व विविध विकास कामे रेंगाळत असल्याने शिवसेनेच्या विरोधी सदस्यांनी सभागृहाला जाब विचारताच सत्ताधारी भाजपचे नगरसेवक मुकेश वानखेडे व संतोष कोळी यांनीदेखील मुख्याधिकार्‍यांना कामे रेंगाळण्याचे कारण स्पष्ट करावे, असा सूर आवळला. कचरा व्यवस्थापनाबाबत घोळ यावरदेखील वानखेडे यांनी बैठकीला चांगलेच धारेवर धरलेण

छत्रपतींच्या पुतळ्यावरून सर्व नगरसेवक आक्रमक
नगरसेवक डॉ. प्रदीप पाटील व संतोष मराठे यांनी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळ्याच्या पाठपुराव्या विषयी सभागृहाला विचारणा केली असता मुख्याधिकार्‍यांनी समिती स्थापन करू, असे सांगताच सर्व नगरसेवक आक्रमक झाले व तत्काळ समिती तयार करण्यात येवून पुतळ्याचा मार्ग मोकळा करण्याची आग्रही मागणी केली परंतु मराठे यांनी सवाल उपस्थित करीत सांगितले की माजी मंत्री खडसेंनी ज्या ठिकाणी पुतळा उभारण्याची घोषणा केली ती जागेवरील अतिक्रमणधारक न्यायालयात गेल्याने ही जागा वादातीत आहे. या जागेला ताब्यात घेण्याबाबत नगरपंचायतीने का कारवाई केली नाही ? असा जोरदार आक्षेप घेत सभागृहाच्या निदर्शनास पुन्हा चालढकल वृत्ती आणुन दिली. यावर मुख्याधिकार्‍यांनी याबाबत तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने सत्ताधारी व विरोधकांनी याबाबत लवकरात लवकर मार्ग काढण्याची मागणी केली. बैठकीत वानखेडे व कोळी यांनी एक वर्षापुर्वी पर्यंत दिलेल्या बांधकाम परवानगी व एन.ए ऑर्डरच्या परवानग्या रद्द करण्यात याव्या, अशी लेखी मागणी केली. यावर सर्व सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी अनुमोदन दिले तसेच सभागृहात शहरातील गटारी दुरुस्ती व गटारीवरील ढापे बांधकामाचा मार्ग तात्काळ काढण्यात यावा, अशी मागणी सर्व नगरसेवकांनी लावून धरल्याने मुख्याधिकार्‍यांनी लवकरात लवकर सदर कामे करण्याचे आश्वासन दिले तसेच मराठे यांनी नागरीकांना घरकुल व आदी कामांसाठी जुने भोगवटा धारकांना उतारे उपलब्ध करण्याची मागणी करीत जलशुद्धीकरण केंद्राच्या पाण्याच्या टाकीला बांधकाम संरक्षित करण्याची मागणी केली व पुर्वी याच टाकीत पाणी व जनावरे पडुन सडल्याची माहितीदेखील दिली .

सर्वसाधारण सभेला यांची होती उपस्थिती
सभागृहात मुख्याधिकारी शाम गोसावी, बांधकाम उपअभियंता सावखेडकर, नगराध्यक्षा नजमा तडवी, उपनगराध्यक्षा मनिषा पाटील, गटनेता पियुष महाजन, शिवसेना गटनेता राजेंद्र हिवराळे , नगरसेवक सविता भलभले, कुंदा पाटील, बिलकिस बी.बागवान, मुकेश वानखेडे, संतोष कोळी, मस्तान कुरेशी, संतोष मराठे, निलेश शिरसाठ, शकील शे, डॉ.प्रदीप पाटील, ललित महाजन आदींसह सर्व नगरसेवक उपस्थित होते.