मुंबई : केंद्रात भाजपची सत्ता असताना आतापर्यंत राम मंदिर का बांधून झाले नाही? असा सवाल उपस्थित करत शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा हातात घेतल्यानंतर इतरांची धावपळ सुरु झाली आहे, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. सत्ता असूनही जर आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर मग या सरकारला सत्तेवरून खाली खेचणार का? असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी संघावर पलटवार केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ठाणे येथे शिबीर सुरू आहे. संघाचे कार्यवाह भैयाजी जोशी यांनी पत्रकार परिषद घेऊन राम मंदिरासाठी १९९२ सारखे आंदोलन करु, असा इशारा दिला होता.
दुष्काळग्रस्तांना मदत करा
उद्धव ठाकरे यांनी आज आमदार आणि खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील भीषण दुष्काळाच्या संदर्भात चर्चा करण्यात आल्याचे ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दुष्काळात उद्धव ठाकरे स्वतः महाराष्ट्राचा दौरा करणार असून आजच्या बैठकीत दुष्काळग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करा, असे आवाहन केल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
अयोध्येला जाणारच..
काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येला जाणार अशी घोषणा केली होती. त्याप्रमाणे “मी अयोध्येला जाणार आहे, यासाठी त्याची तयारी सुरू आहे.असेही उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.